Devoni Farmer Bullock
लातूर : देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना शासनाकडून मदत म्हणून देण्यात आलेला बैल अशक्त व आजारी असल्याचे समोर आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत संबंधित शेतकऱ्याच्या पसंतीनुसार सक्षम बैल उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने योग्य बैलाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे, बैलाची कार्यक्षमता स्वतः काशिनाथ गायकवाड यांनी औताला जुंपून तपासल्यानंतरच तो त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतकरी असून त्यांच्याकडे असलेल्या बैलजोडीच्या साहाय्याने ते व त्यांची पत्नी हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची मशागत, नांगरणी, पेरणी व वखरणीची कामे करून उदरनिर्वाह करतात. मात्र, ५ जून रोजी झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज पडून त्यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना पत्नी हौसाबाई यांनाच जोखडाला जुंपावे लागले होते.
ही बाब मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-बालकवडे यांना तातडीने बैल उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एक बैल देण्यात आला; मात्र तो औताला जुंपल्यानंतर वारंवार बसत असल्याने त्याची कार्यक्षमता अपुरी असल्याचे आढळले. याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या पसंतीनुसार सक्षम बैल देण्याचे आदेश दिले.
त्यानुसार शुक्रवारी पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून रेणापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याकडील बैल निवडला. हा बैल औताला जुंपून त्याची ताकद व कार्यक्षमता स्वतः काशिनाथ गायकवाड यांनी तपासली. समाधान झाल्यानंतर त्यांच्या संमतीने तो बैल त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडीले, सहाय्यक आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे, देवणी तालुका सहाय्यक आयुक्त डॉ. जे. पी. वाघमारे तसेच रेणापूर तालुका सहाय्यक आयुक्त डॉ. आर. जी. पडगीलवार उपस्थित होते.