Fraud Case file photo
लातूर

Latur Crime : बीएसएफ भरती प्रक्रियेत 'मुन्नाभाई' स्टाईल तोतयेगिरी; मध्य प्रदेशातील दोघांना चाकूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बनावट ओळखीद्वारे शासनाची फसवणूक; संशयीत आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : येथील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) उपशिक्षण केंद्रात (STC) सुरू असलेल्या जी.डी. कॉन्स्टेबल पदभरती प्रक्रियेत तोतयेगिरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट ओळख धारण करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील दोन तरुणांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भरती प्रक्रियेत असा झाला बनाव

मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत बीएसएफ कॅम्प परिसरात ही भरती प्रक्रिया पार पडत होती. यावेळी रविसिंग हाकीमसिंग (रा. जबलपूर, मध्य प्रदेश) आणि शिवकुमार रामविरसिंग (रा. बालाघाट, मध्य प्रदेश) या दोघांनी मूळ उमेदवारांऐवजी स्वतःची बनावट ओळख सांगून भरती प्रक्रियेत प्रवेश मिळवला. मात्र, कागदपत्रांची पडताळणी आणि संशयास्पद हालचालींमुळे हा तोतयेगिरीचा प्रकार बीएसएफ प्रशासनाच्या निदर्शनास आला.

पोलीस कारवाई आणि न्यायालयीन निकाल

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बीएसएफचे अधिकारी विपीनकुमार बनारसीदास बबोरिया (वय ४१) यांनी चाकूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. या फिर्यादीवरून दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT