लातूर : लातूर शहरात रविवारी रात्री वैभव नगर येथे कोयता गँगने पसरवलेल्या दहशतीच्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच सोमवारी (दी.१६) सायंकाळी येथील औसा रोडवर असलेल्या पुरणमल शासकीय तंत्रनिकेतजवळ कॉलेजवळ झालेल्या कोयता हल्ल्यात एक विद्यार्थी मरण पावला. विक्रम नारायण पांचाळ (वय 21) असे त्याचे नाव असून आदित्य भारत साडे (वय 20), सुजल बलभीम रेड्डी (वय 20) व शंतनू माणिक परांदे वय (वय 27) अशी जखमींची नावे आहेत.
रविवारी (दि. १५) रात्री लातूर शहरातील वैभव नगर परिसरात काही तरुणांनी कोयते घेऊन रस्त्यावर फिरत त्याची दहशत पसरवली होती. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. काही मिनिटांतच या गॅंगच्या व्हीडीओ क्लिप्स समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या.अशातच गजबजलेल्या औसा रोडवर सोमवारी सायंकाळी पुरणमल लाहोटी तंज्ञनिकेतन वस्तीगृहातील कही विद्यार्थ्यांत वाद झाला.
यावेळी कोयत्याने झालेल्या हाणामारीत विक्रम नारायण पांचाळ हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषीत केले. या हाणामारीत अन्य तिघे जखमी झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी एन सोनवणे यांनी सांगितले. मयत विक्रम याच्या छातीच्या डाव्या बाजूवर खोलवर वार करण्यात आले होते. तो गंभीर जखमी झाला होता व रक्तस्त्रावही अधिक झाल्याने तो मरण पावला.
प्राथमिक माहितीनुसार एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या दुचाकीचा रिडींग मिटर फोडल्यामुळे त्यात वाद सुरू झाला. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने मिटर बदलून दिला. परंतु, नंतर बोलताना वाद झाला त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी विक्रम पांचाळ याच्यावर व त्याच्या अन्य तीन मित्रांवर कोयत्याने वार करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी समरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे व त्यांच्या टिमने घटनास्थळी भेट दिली. जखमींना शासकीय रुग्णालयात पाठवले. यावेळी विक्रम पांचाळ याला तपासांती डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे.