

चाकूर : तालुक्यातील आष्टा येथे कौटुंबिक वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीचा मारहाणीत खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात पत्नी व मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शमशोद्दीन जैनोद्दीन शेख (वय 40, रा. आष्टा ता. चाकूर) यांचा दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 ते 11 फेब्रुवारी पहाटे 1 वाजण्याच्या दरम्यान आरोपींच्या राहत्या घरी मारहाणीत मृत्यू झाला. दारू पिऊन त्रास देण्याच्या कारणावरून संगनमत करून कोणत्यातरी जाड वस्तूने त्यांच्या डोके, पाठ, तोंड तसेच हात-पायावर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी जैनोद्दीन घुडुसाहेब शेख (वय 60, रा. आष्टा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. 72/2026, कलम 105, 3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पत्नी नसरीन शमशोद्दीन शेख (वय 35) व त्याच्या मुलावर आरोप ठेवण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि आर.टी. चव्हाण हे करीत आहेत. या घटनेने आष्टा व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.