उदगीर तालुक्यातील नेत्रगाव शिवारात शनिवारी सकाळी एका ४५ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. अनैतिक संबंधातून वाद झाल्याने हा खून झाल्याचे उघड झाले असून दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे नाव पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड (वय ४५, रा. डोंगरगाव, सध्या समता नगर, उदगीर) असे आहे. यांचा मृतदेह ६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नेत्रगाव-उदगीर रोडवर समता नगर जवळ रस्त्यालगत आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून अनैतिक संबंधातून झालेल्या वादामुळे गायकवाड यांच्या डोक्यात प्रहार केला आणि त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह रस्त्यालगत फेकून दिला.
या प्रकरणी मृताचा भाऊ हनुमंत कोंडीबा गायकवाड यांनी तक्रार दिली असून, सुनीता मधुकर पोरखे (रा. समता नगर, उदगीर) आणि अंबादास प्रकाश बिरादार (रा. येनकी, ता. उदगीर) या दोघांवर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. देवकत्ते करीत आहेत.