लातूर : या घटनेनंतर फॉरेन्सिक आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.  pudhari photo
लातूर

Latur Parcel Blast : संभाजीनगरवरून आलेल्‍या पार्सलचा लातुरात भीषण स्फोट

एअरगनच्या ज्वलनशील ‘सीओटू’ कार्ट्रिजमुळे झाला घात

पुढारी वृत्तसेवा

लातूर : शहरातील जुने रेल्वेलाईन रस्त्यालगत असलेल्या उमाटे कुरिअर सर्व्हिसेसच्या दुकानासमोर शनिवारी (दि. ३१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास झालेल्या भीषण पार्सल स्फोट झाला. या घटनेत कुरीअर कर्मचारी नागनाथ स्‍वामी गंभीर जखमी झाले तर अन्‍य एक किरकोळ जखमी झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या पार्सलमध्ये एअर गनमध्ये वापरले जाणारे ‘सीओटू’ (कार्बन डायऑक्साइड) गॅस सिलेंडर किंवा गॅस कार्ट्रिज होते.

हे पार्सल वाहनातून खाली उतरवताना किंवा हाताळताना झालेल्या तीव्र घर्षणामुळे हा भीषण स्फोट झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आता लातूर पोलिसांसह राज्याची दहशतवाद विरोधी यंत्रणा (एटीएस) अधिक सतर्क झाली आहे.

उमाटे कुरिअर सर्व्हिसेसच्या दुकानासमोर एमएच २४ बीडब्ल्यू ०३९९ क्रमांकाच्या वाहनातून पार्सल उतरविण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला होता. यामध्ये कर्मचारी नागनाथ स्वामी गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर जेव्हा पोलिस, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाने (डॉग स्क्वाड) त्या संपूर्ण वाहनाची आणि इतर पार्सलची कसून तपासणी केली; तेव्हा तपासादरम्यान संबंधित वाहनात एक बंदूक देखील आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी तातडीने ही बंदूक जप्त केली असून तपासाची चक्रे संभाजीनगरच्या दिशेने फिरवली आहेत.

या धक्कादायक प्रकरणावर बोलताना कुरिअर कंपनीच्या चालकाने प्रशासनासमोर महत्त्वाचा खुलासा केला आहे. शासकीय आणि व्यापारी नियमांनुसार, लातूरमधून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पार्सलची त्यांच्याकडे संगणकावर सविस्तर नोंद असते; परंतु बाहेरून किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून लातूरमध्ये येणाऱ्या पार्सलच्या आत नक्की काय वस्तू आहे, याची कंपनीला किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना नसते. यामुळेच हा अनर्थ घडल्याचे समोर येत आहे.

कुणी कुणासाठी पाठविले? तपास सुरू

हे पार्सल छत्रपती संभाजीनगरहून लातूरमधील एका बंदूक घराच्या नावाने आले होते; मात्र ते नेमकं कोणी पाठवलं होतं आणि लातूरमध्ये ते नक्की कोणाला डिलिव्हर होणार होतं, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वतः लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT