कलकोटी गावात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला Pudhari
लातूर

Latur Illegal Liquor | चाकूर : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; दारू विक्रेत्याला घरात घुसून चोप

चाकूर तालुक्यातील कलकोटी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला

पुढारी वृत्तसेवा

Chakur Illegal Liquor Sale

चाकूर : तालुक्यातील कलकोटी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात शनिवारी (दि. 27) सकाळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. संतप्त महिलांनी थेट एका दारू विक्रेत्याच्या घरात घुसून त्याला चोप दिल्याने गावात एकच खळबळ उडाली.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर दारूविक्री सर्रास सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अखेर महिलांचा संयम सुटला. त्यातूनच शनिवारी सकाळी कलकोटी गावात महिलांनी स्वतः पुढाकार घेत अवैध दारूविक्री करणाऱ्याला जाब विचारत त्याच्यावर हल्ला केला.

अवैध दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप महिलांनी केला. संबंधितांवर कठोर कारवाई करून गावातील अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या घटनेनंतर काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पोलिसांची छापेमारी; दोघांवर कारवाई

दरम्यान, शनिवारी चाकूर पोलिसांनी तालुक्यातील विविध ठिकाणी छापेमारी करून अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई केली. कलकोटी येथील एका दारू विक्रेत्याला तसेच मषनेरवाडी येथील एका धाबा चालकाला ताब्यात घेण्यात आले. कलकोटी फाटा येथील आणखी एक धाबा चालक फरार झाल्याची माहिती असून त्याच्याविरुद्धही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत किती मुद्देमाल जप्त करण्यात आला, याची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण रायझुबे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT