Chakur Trauma Care Hospital Panthers Yuva Agitation Pudhari
लातूर

Chakur Protest | चाकूर येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलसाठी व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे आंदोलन

पोलिसांनी प्रसंगावधान राखत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले

पुढारी वृत्तसेवा

Chakur Trauma Care Hospital Panthers Yuva Agitation

चाकूर : येथील रखडलेले ट्रॉमा केअर हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करून ते रुग्णालय जनतेच्या सेवेत खुले करावे, या मागणीसाठी व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.३) आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत आंदोलनकर्त्यांना रोखून ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष शरद किणीकर यांच्या नेतृत्वाखाली जुने बसस्थानक कामानीसमोर हे आंदोलन करण्यात आले.

चाकूर येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम शासनाच्या उदासीनतेमुळे रखडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. या रुग्णालयाचे काम अपूर्ण असल्याने चाकूर तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रखडलेले काम तातडीने सुरू करून रुग्णालय लवकरात लवकर जनतेच्या सेवेत खुले करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अन्यथा यापेक्षाही भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शरद किणीकर आणि तालुकाध्यक्ष अजय वाघमारे यांनी दिला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शरद किणीकर, तालुकाध्यक्ष अजय वाघमारे, ग्रुप तालुकाध्यक्ष समाधान गायकवाड, शहराध्यक्ष विक्रम कांबळे, कामगार आघाडी जिल्हा संघटक गोविंद कांबळे, तालुका सचिव गजानन कांबळे, वाहतूक आघाडी लातूर शहराध्यक्ष शाहरुख मणियार यांच्यासह पदाधिकारी,नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान, कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रुग्णालयाचे काम अपूर्ण राहिल्यास त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT