Latur News:
चाकूर : येथील ग्रामीण रुग्णालयासमोर रविवारी रात्री ८ वाजता घडलेल्या विचित्र व भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन त्यानंतर मिक्सर ट्रक डोक्यावरून गेल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातानंतर मिक्सर चालकासह दुसरा मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या अपघातात विशाल विठ्ठल शिंदे (वय २८, रा. साठेनगर, चाकूर) या युवकाचा मृत्यू झाला, तर रामेश्वर लोखंडे (वय २७) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी रामेश्वर लोखंडे याच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयासमोर दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत विशाल शिंदे रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणारे मिक्सर वाहन त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर दुसरा मोटारसायकलस्वार आणि मिक्सर चालक घटनास्थळावरून पसार झाले. त्यामुळे या अपघाताचे नेमके कारण काय, तसेच रात्रीच्या वेळी मिक्सर कुठे आणि का जात होते, याचा तपास करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, मयत विशाल शिंदे याचे वडील नगरपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर विशाल यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा प्रस्ताव नगरपंचायतीने शासनाकडे पाठविला होता आणि लवकरच त्यांना सेवेत रुजू होण्याचे आदेश मिळणार होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. मात्र नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांना हिरावून घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशाल याच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. घरचा आधार हरपल्याने कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. जखमी रामेश्वर लोखंडे हेही सध्या नगरपंचायत कार्यालयात कंत्राटी ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. या घटनेमुळे चाकूर शहरात हळहळ व्यक्त होत असून फरार वाहनचालकांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.