

नागाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) येथील महाडिक वसाहतीसमोर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव आयशर टेम्पोने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत श्वेता अक्षय चव्हाण (वय २५, रा. रेठरे बुद्रुक, जि. सांगली) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती अक्षय चव्हाण (वय २७) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूकीची काही काळ कोंडी झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक येथील अक्षय आणि श्वेता हे दाम्पत्य कोल्हापूरमधील एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. शनिवारी सुट्टी असल्याने दोघेही आपल्या मोटरसायकलवरून (क्र. MH 10 CP 0856) गावी निघाले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ते टोप येथील महाडिक वसाहतीजवळ आले असता, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने (क्र. MH 14 - 9144) त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, श्वेता चव्हाण या टेम्पोच्या चाकाखाली आल्या आणि त्यांच्या शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय चव्हाण हे देखील रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक टेम्पोसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, परिसरातील सजग नागरिकांनी तातडीने पाठलाग करून संभापूर जवळ टेम्पो अडवला. अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
टोप जवळील पेठवडगावला जाणाऱ्या सेवा रस्ता रस्त्याच्या कामामुळे अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे मुख्य महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. "प्रशासनाने दोन्ही बाजूचे सेवा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा , अन्यथा अजून किती निष्पाप जीव जाणार?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या अपघाताची नोंद रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.