Chakur Zilla Parishad Panchayat Samiti reservation
चाकूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण सोडत आज (दि.१३) काढण्यात आली. तालुक्यातील पाच जिल्हा परिषदेचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात तर १० पंचायत समितीचे आरक्षण चाकूर पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी आहिल्या गाठाळ यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.
यावेळी तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, बालाजी इंगळे, संजय कासरळीकर,अंगद कासले आदिजण उपस्थित होते.
याप्रसंगी तालुक्यातील जानवळ पंचायत समिती गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग, झरी बु. गण हा सर्वसाधारण महिला, चापोली गण सर्वसाधारण, आजनसोंडा बु. गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, रोहिणा गण सर्वसाधारण महिला, आटोळा गण अनुसूचित जाती, वडवळ गण अनुसूचित जाती महिला, आष्टा गण सर्वसाधारण महिला, नळेगाव आणि सुगाव हे दोन गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेले आहे. यामुळे पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झालेला पाहायला मिळाला आहे.
चाकूर तालुक्यातील पंचायत समितीबरोबरच जिल्हा परिषदेच्या ५ गटासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. यावेळी जानवळ जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग, चापोली गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,रोहिणा गट अनुसूचित जाती महिला, वडवळ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नळेगाव गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाला आहे.
जिल्ह्यातील मिनी मंञालयासाठी ही निवडणूक अनेकांची शक्तिपरीक्षा ठरणार आहे. कारण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या युतीमुळे जिल्ह्यात त्यांचे पारडे जड झाले असून मविआ समोर मोठे आव्हान आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, चाकूर तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकांचा दिवाळीनंतरच बिगुल वाजण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, चाकूर पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले असून यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे.