

संग्राम वाघमारे
चाकूर: नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गातील ( ओबीसी) महिला प्रवर्गाला जाहीर होताच यासाठी इच्छुकांनी कंबर कसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
राज्यातील १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत ६ आक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयात निश्चित करण्यात आले असून यामध्ये चाकूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील ( ओबीसी) महिला प्रवर्गाला जाहीर करण्यात आले. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरु झाले आहे.
नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची मुदत २०२६ या कालावधीमध्ये संपुष्टात येत असल्याने नगराध्यक्षपदाची सोडत आज काढण्यात आली.यामध्ये चाकूर नगरपंचायतीचा समावेश आहे. चाकूर नगरपंचायत १६ मार्च २०१५ रोजी अस्तित्वात आली.पहिले नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सुटले तेंव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या मिलिंद महालिंगे यांची प्रथम नगराध्यक्षपदी तर काँग्रेसचे विलासराव पाटील यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली.
उर्वरित अडीच वर्षाचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुला प्रवर्गातील महिलेला सुटले यात भाजपने चार नगरसेवकांच्या बळावर, शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस व अपक्ष नगरसेवक फोडून सत्तांतर घडवून भाजपाच्या रूपाली पवार नगराध्यक्ष व नितीन रेड्डी उपनगराध्यक्ष झाले.
२०२१- २२ मध्ये नगरपंचायत निवडणूक पार पडल्या यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीचा उदय झाला आणि ६ नगरसेवकाच्या बळावर भाजपच्या ३ नगरसेवकाशी हातमिळवणी करून सत्तेची समीकरणे शेवटच्या दिवशी जुळवली. एकीकडे काँग्रेस ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ नगरसेवकांच्या बळावर बहुमताचा आकड्यासाठी एक नगरसेवक आभावी त्यांच्या सत्ता स्थापनेच्या आशेवर पाणी फेरले गेले. त्यावेळी प्रहारचे कपिल माकणे नगराध्यक्ष आणि भाजपचे अरविंद बिरादार हे उपनगराध्यक्ष झाले.
माकणे आणि बिरादार यांचा अडीच वर्षाचा काळ संपल्यानंतर त्यांना उर्वरित काळासाठी परत नगराध्यक्षपदासाठी संधी मिळाली. त्या संधीचे सोने माकणे यांना जास्त काळ करता आले नाही. उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार यांच्यावर अविश्वास आणण्यात आला. वातावरण गरम असतानाच राजकीय खलबत्ते सुरु झाली. नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत प्रहारच्या काही नगरसेवकांनी त्यांना साथ दिल्यामुळे अविश्वास आणण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे कपिल माकणे यांना साडेतीन वर्षांनी नगराध्यक्षपद सोडावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे करीम गुळवे यांची नगराध्यक्षपदी आणि भाजपचे साईप्रसाद हिप्पाळे यांची उपनगरध्यक्षपदी वर्णी लागली असून यांचा कार्यकाळ २०२६ ला संपुष्टात येणार आहे.
गत निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय सुटलेला नसल्यामुळे अनेक राजकीय घडामोडी झाल्या होत्या. त्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. यंदा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यामुळे ओबीसी प्रवर्गाला हे आरक्षण सुटल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी मांडला आहे. यामुळे चर्चेचे राजकीय गुऱ्हाळ सुरु झालेले पाहायला मिळत आहे.निवडणूकीला १४ महिन्यांचा कालावधी जरी असला तरी इच्छुकांनी मात्र नगराध्यक्षपदासाठी चांगलीच कंबर कसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
चाकूर नगरपंचायतीच्या २०२१ -२२ च्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातील वॉर्ड १ मधून सुजाता रेड्डी, वॉर्ड ८ शाहीनबानू सय्यद, वॉर्ड ९ ज्योती स्वामी, वॉर्ड ११ गंगुबाई गोलावार आणि वॉर्ड १३ गोदावरी पाटील या पाच महिलांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या.आता ओबीसी आरक्षणाचा तिडा सुटल्यामुळे त्या नगरसेविका नागरिकांचा मागास प्रवर्गातून (ओबीसी ) पुन्हा दावेदार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.