चाकूर येथील पंचायत समितीतील लिपिकांनी आजपासून असहकार आंदोलनास सुरुवात केली Pudhari
लातूर

Chakur Protest | चाकूर पंचायत समिती लिपिकांचे असहकार आंदोलन सुरु; २३ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा

२१ कर्मचारी आंदोलनात सहभागी

पुढारी वृत्तसेवा

Chakur Panchayat Samiti clerk protest

चाकूर : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील लिपिक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चाकूर येथील पंचायत समितीतील लिपिकांनी आजपासून (दि. १६) असहकार आंदोलनास सुरुवात केली आहे. चाकूर तालुक्यातील एकूण २१ लिपिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारीत वेतनश्रेणी लागू करावी, पदोन्नती स्तर कमी करून पदनामात बदल करावा, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षायादीत असलेल्या सर्वांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात दि. १६ ते १७ फेब्रुवारी २०२६ कार्यालयात उपस्थित राहून स्वाक्षरी करणे व काळी फीत लावून निषेध नोंदवणे, १८ फेब्रुवारी २०२६ कार्यालयात उपस्थिती लावून कार्यालयासमोर शांततापूर्ण मार्गाने घोषणाबाजी करणे, २० फेब्रुवारी २०२६ शासनाला दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करणे, दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत संपूर्ण कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

लिपिक बांधवांनी हे आंदोलन सनदशीर मार्गाने करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या असहकार आंदोलनात अध्यक्ष संग्राम भुरे,उपाध्यक्ष संतोष मुदमे,सचिव अतुल गायकवाड,सहसचिव सदाशिव भिसे,मार्गदर्शक व्यंकटराव घोडके, माधव वागलगावे,गिरीधर तिकटे, मंगेश बिराजदार,राजेंद्र नरवाडे,भागवत गडदे,अमोल कराड,ए एच कल्याणे,ए एस भणगे आदी कर्मचारी सहभागी होते.

या आंदोलनामुळे पंचायत समितीच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासन आणि शासन यामध्ये समन्वय साधून लवकरात लवकर तोडगा निघेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT