MNREGA Scam Latur
चाकूर : चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा तसेच पंचायत समितीअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला बुधवारी (दि. २९) दहाव्या दिवशी नाट्यमय वळण मिळाले.
उपोषणस्थळाशेजारील कमानीवर चढून काही शेतकरी व नागरिकांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची तयारी दर्शविली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधितांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
बालाजी पाटील यांनी चाकूर पंचायत समितीअंतर्गत मनरेगा योजनांमध्ये सुमारे २०० कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याच मागणीसाठी ते २० जुलैपासून चाकूर येथील जुन्या बसस्थानकासमोरील कमानीजवळ आमरण उपोषण करत आहेत.
उपोषणाच्या समर्थनार्थ बुधवारी सकाळी काही शेतकरी कमानीवर चढले. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन घटनास्थळी बोलावून शिडीच्या सहाय्याने कमानीवर चढलेल्या नागरिकांना सुरक्षित खाली उतरविण्यात आले. आत्मदहनाचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असलेल्या काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, या आंदोलनाला दिवसेंदिवस शेतकरी, व्यापारी व विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. २८) चाकूर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला चाकूर शहरासह चापोली, वडवळ नागनाथ, जानवळ आणि लातूर रोड परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला, तर सकाळी शहरातून मोर्चाही काढण्यात आला.
शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करणे, मनरेगा योजनांतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे, शेतकऱ्यांसाठी मनरेगाअंतर्गत विहिरी, गोठे व शेततळ्यांची कामे मंजूर करणे तसेच एक रुपयात पीक विमा योजना सुरू करणे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून शासन व प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
उपोषणस्थळी विविध राजकीय नेते, व्यापारी, शेतकरी तसेच सामाजिक व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी भेट देऊन पाठिंबा व्यक्त करत आहेत. वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.