Babasaheb Patil Chakur Crop Inspection
चाकूर : तालुक्यातील हिंपळनेर परिसरातील खरीप हंगामातील पीक परिस्थितीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती, झालेल्या नुकसानीसह विविध अडचणींची माहिती जाणून घेतली.
नैसर्गिक संकटामुळे खरीप पिकांवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री पाटील यांनी हिंपळनेर परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी चाकूर तालुक्यातील पीक परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती व नुकसानीबाबत मंत्र्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, नैसर्गिक संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पीक परिस्थितीचा आढावा घेऊन शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी संतोष माने, तालुका कृषी अधिकारी शिवचंद्रपाल जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, उपसभापती भुजंग शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, मछिंद्र नागरगोजे,
प्रतीक केदार, सिद्धेश्वर अंकलकोठे, गणपत कवठे, नगराध्यक्ष भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, पपन कांबळे, इलियास सय्यद, विवेक शिंदे, गणेश पाटील, संदीप शेटे, श्रीनाथ सावंत, बिलाल पठाण, अनिल वाडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी,शेतकरी बांधव उपस्थित होते.