Ahmedpur heavy rainfall
अहमदपूर : मागच्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक लहान मोठ्या नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असून नदी नाले एक झाल्याने शेत शिवारात पाणी घुसले आहे.संपर्क तालुका जममय झाला आहे. २६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून १३७ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
यामुळे तालुक्यातील हगदळ नदीवरील पुल पाण्यात गेला असून या भागातील वरवंटी शिंदगी बुद्रुक आदी गावांचा संपर्क तुटला आहे.काळेगाव येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे या भागातील शेनकूड सुमठाणा, टाकळगाव खंडाळी आदी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.थोडगा ता.अहमदपूर येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे या भागातील मोघा,शिंदगी खुर्द,तिर्थ धानोरा आदी गावातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.कोळवाडी ते किनगाव रस्त्यावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.माकणी येथील पुल पाण्याखाली गेल्यामुळे माकणी चोबळी रस्ता बंद झाला आहे.
शिरूर ताजबंद - आंबेगाव, खरबवाडी आदी गावामधील पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे .एकंदरीत तालुक्यातील लातूर- नांदेड राष्ट्रीय महामार्ग ३६१ व अहमदपूर -अंबाजोगाई हा राष्ट्रीय महामार्ग वगळता तालुक्यातील राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते व छोटेमोठे रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असून नद्यांना महापूर आला आहे त्यामुळे या गावांचा तालुक्यातील संपर्क तुटला आहे.तालुक्यातील सर्वच गावातील शेत शिवारात पाणी घुसले असून खरीप पिकांची वाताहत झाली आहे.नदीकाठावरील घरात गोठ्यात पाणी शिरले आहे.जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वायगाव ता.अहमदपूर येथील साठवण तलाव क्रमांक एक ची पाळू खचली असून कोणत्याही क्षणी तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून जलसंपदा व महसूल विभागाचे कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत.