Accident Pudhari
लातूर

Latur Accident : चाकूरजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; भरधाव कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

चालक कारसह फरार; चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : तालुक्यातील चापोली येथील उड्डाणपुलाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित कारने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, कार चालक अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी गाडीसह घटनास्थळावरून फरार झाल्याचे समोर आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास सुनिता बालाजी माने या चापोली येथील उड्डाणपुलाजवळील महामार्ग ओलांडत होत्या. त्याचवेळी २५ बीएच ४९५१ टी या क्रमांकाच्या कारने त्यांना समोरून जोराची धडक दिली. कारचा वेग इतका प्रचंड होता की, या धडकेमुळे सुनिता माने या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस कारवाई आणि तपास

या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेचा मुलगा सोहम बालाजी माने (रा. अजनसोंडा बु.) याने दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात सोमवारी (१६ मार्च) अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित चालकावर 'भारतीय न्याय संहिता' आणि 'मोटार वाहन कायद्या'च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

सध्या पोलीस हेडकॉन्स्टेबल गुंडरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अपघातातील कारचा क्रमांक पोलिसांकडे उपलब्ध असून, त्या आधारे फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रा फिरवली आहेत.

परिसरात हळहळ

रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे चापोली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. महामार्गावर वाढती वाहनांची गती आणि चालकांचा निष्काळजीपणा निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा संताप स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT