अहमदपूर : छातीत दुखत आहे म्हणून उपचारासाठी दवाखान्यात निघालेल्या शिक्षकाची ऑल्टो कार रस्त्यावरील पुलाच्या कठड्यास धडकून पेटली त्यात आगीच्या भस्मस्थानी पडून शिक्षकाचा जळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना १५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की माधव बाबुराव श्रीवाड वय: ४५ वर्षे , रा.कोळवाडी ता.अहमदपूर हल्ली मुक्काम टेंभूर्णी रोड अहमदपूर हे जि.प.प्रा.शाळा हिप्परगा (कोपदेव) ता.अहमदपूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. दररोज प्रमाणे ते शाळेत गेले असता छातीत वेदना होत आहेत म्हणून स्वतःच्या एमएच.२२एच.१९१४ या ऑल्टो कारने दवाखान्यात जाण्यासाठी अहमदपूरकडे निघाले असता
वाटेत हिप्परगा काजळ ता.अहमदपूर गावानजीक त्यांची कारने रस्त्यावरील पुलाच्या कठड्यास धडकून पेट घेतली.पेटत्या कारने आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे शिक्षक माधव बाबुराव श्रीवाड यांना बाहेर पडण्याची कुठलीच संधी मिळाली नाही.त्यात ते जळून खाक झाले.
माधव श्रीवाड हे स्वतःच गाडी चालवत होते. छातीत दुखत असल्यामुळे कदाचित रस्त्यातच त्यांना अटॅक आला असावा त्यामुळे त्यांचे गाडीवरून नियंत्रण सुटून गाडी रस्त्यावरील पुलास धडकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील शैक्षणिक पंढरीत माधव श्रीवाड हे सर्वदूर सर्वत्र परिचित होतो.शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रातही ते कार्यरत होते. ह.भ.प.म्हणून ते नावारूपास आले होते. या त्यांच्या आकस्मिक निधनाने तालुक्याच्या शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागच्या महिन्यात त्यांच्या एका दुसर्या कारने अशीच पेट घेतली होती.त्या प्रसंगातून ते कसेबसे बाहेर पडल्याने व नशीब बलवत्तर म्हणून वाचले होते.कालच्या प्रसंगात मात्र त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही.विशेष म्हणजे त्याच स्पॉट दरम्यान त्यांच्या दोन्हीही वाहनांना आग लागावी याला काय म्हणावे. हा योगायोग की नियती.