Latur ST Office Morcha 1972 History In Marathi
उमेश काळे, छत्रपती संभाजीनगर
1972 चा दुष्काळ, महागाईची झळ, सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष अशा एक ना अनेक कारणांमुळे मराठवाडा त्रस्त झाला होता. छुप्पा असंतोष धुमसत होता. याच काळात लातूर आणि धाराशिव या दोन शहरांमधील वाद वाढू लागला. लातूर मोठे शहराचे ठिकाण असूनही धाराशिवला जिल्ह्याचा दर्जा होता. शहर असल्याने काही कार्यालये लातुरात होती. त्यात एसटीचे विभागीय कार्यालयही लातुरात करण्याचा निर्णय झाला, पण या निर्णयात बदल झाला, हे कार्यालय धाराशिवला करण्याचे ठरले..झाले लगेचचण लोक रस्त्यावर आले.
विभागीय कार्यालयाच्या मागणीसाठी लातुरात सर्वपक्षीय मोर्चा निघाला, या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले. मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांना गोळीबाराचा वापर करावा लागला, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. यादिवशी तारीख होती 26 ऑगस्ट, 1972...
हा काळ दुष्काळाचा असल्याने स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी काही संघटना पुढे सरसावल्या खर्या, परंतु त्यांनाही मर्यादा होत्या. रोहयोची नुकतीच कुठे सुरवात झाली होती. त्यामुळे विकासाच्या अपेक्षेने मोर्चे निघाले की लोक त्यात सहभागी होत. तसे एसटीचे कार्यालय शहरात व्हावे, ही किरकोळ मागणी. पण त्यासाठी दररोज आंदोलने सुरू होती.
याबाबत सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सांगितले, की त्यावेळी मी शिक्षणसाठी लातुरात होतो. एसटी कार्यालयाची मागणी जोर धरू लागली आणि 26 तारखेला मोठा मोर्चा निघाला. मोर्चा अनियंत्रित झाल्याने पोलिसांनी लाठीमार, अश्रुधर व नंतर गोळीबार केला. त्यात हणुमंत गायकवाड हा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि मुनीमाचे काम करणारा पंढरीनाथ कोळी हे दोघे मरण पावले. तेव्हाचा विचार करता धाराशिवचे स्वरूप हे लातुरच्या तुलनेने लहान होते. त्यामुळे एसटी कार्यालयाची मागणी रास्त होती. पण आंदोलनाला हिंसक वळण मिळूले. परिणामी पोलिसांच्या मदतीला एसआरपी शहरात तैनात करण्यात आली.
एसआरपीचे फटके युवकांना बसले. एसआरपीची एक तुकडी कॉलेजातही घुसली. प्रकाश पाठक सारख्या आंदोलनात अग्रेसर असणार्या युवकांना पाठीवर वळ येईपर्यंत मारहाण झाली. वातारवण निवळण्यास काही दिवस लागले. आंदोलन स्वयंस्फूर्तीने असले तरी दुष्काळाचे गडद संकट हे त्यामागील कारण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कुमार सप्तर्षींचा प्रवेश
लातुरात युक्रांदचे काम बर्यापैकी होते. युक्रांदचे नेते कुमार सप्तर्षी लातुरात आले आणि त्यांनी आंदोलन करणार्यां कार्यकर्त्यांनी धीर दिला. या आंदोलनात वसंतराव काळे (शिक्षक नेते व आमदार) यांना पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास सहन करावा लागला तर समाजवादी नेते अॅड. मनोहरराव गोमारे यांच्या गुडघ्याचे हाड मोडले, अशी माहिती ‘लातूर : परिघावरील आवाज’ (संपादक : प्रा. अनिल जायभाये) या पुस्तकात देण्यात आली आहे.
कुमार सप्तर्षी यांनी या भागातील परिस्थिती लक्षात घेत पुढे दलित विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्तीचा विषय हाती घेतला. त्यासाठी जिल्ह्यात लढा उभारला.
परिणामी दलित विद्यार्थ्यांची फी माफही झाली आणि प्रलंबित विषय सोडविल्या जाऊ लागले. कालांतराने दलित संघटना स्वतंत्रपणे लढू लागल्या. या काळात जिल्ह्यात झालेल्या काही ग्रामपंचायती युक्रांदचे विचार मान्य असणार्या मंडळींनी जिंकल्या. अर्थात, लातूर परिसरात कोणतेही आंदोलन झाले, की लातूर शहराला जिल्ह्याचा दर्जा द्यावा आणि मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळावे, या मागण्या ठरलेल्याच असत. या दोन्ही मागण्यांपैकी मुख्यमंत्रीपदाची मागणी 1974 च्या आंदोलनानंतर मान्य झाली.