Hyderabad Gazette for Koli Mahadev
निलंगा: मराठवाड्यातील कोळी महादेव आणि कोळी मल्हार जमातींसाठी हैदराबाद गॅझेट लागू व्हावे, या मागणीसाठी निलंगा तालुक्यात कोळी महादेव समाजाचा नुकताच एल्गार मेळावा पार पडला. या वेळी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा मेळावा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली झाला. यामध्ये कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांनी १९५० पूर्वीच्या ‘कोळी’ नोंदीला वैध ठरवून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जातवैधता देण्यात यावी, तसेच हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी केली.
गेल्या वर्षभरात या मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर दंडवत आंदोलन, नऊ दिवसांचे अन्नत्याग उपोषण अशा विविध आंदोलनांची मालिका कोळी समाजाने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान निवेदनही देण्यात आले होते; मात्र अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.
इतिहासाचा दाखला देत समाज नेत्यांनी स्पष्ट केले की, भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले असले तरी १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामच्या अधिपत्याखालील मराठवाडा भारतात विलीन झाला. निजामकालीन गॅझेटमध्ये कोळी महादेव व कोळी मल्हार जमातींचा स्पष्ट उल्लेख असून त्यांचे वास्तव्य बालाघाट पर्वतरांगा, नळदुर्ग परिसर आणि गोदावरी नदीच्या दक्षिण भागात असल्याचे नमूद आहे.
राज्य सरकारने नुकताच मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी व मराठा-कणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर कोळी महादेव व कोळी मल्हार जमातींनाही हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी, अशी समाजाची आग्रही मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास येत्या १७ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मेळाव्यातून देण्यात आला.