Latur News : पावसाची हुलकावणी, ढगाळ वातावरणामुळे अळीचा वाढला प्रादुर्भाव; उसाची वाढ खुंटली file photo
लातूर

Latur News : पावसाची हुलकावणी, ढगाळ वातावरणामुळे अळीचा वाढला प्रादुर्भाव; उसाची वाढ खुंटली

सोयाबीन, ऊसासह खरीप पिके संकटात; दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

पुढारी वृत्तसेवा

Kharif crops, including soybean and sugarcane, in jeopardy; wait for substantial rainfall continues

शिवाजी गायकवाड

तांदुळजा : लातूर तालुक्यातील तांदुळजा परिसरासह अन्य भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, ऊसासह खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या अळी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

सध्या काही भागात सोयाबीन पीक फुलोऱ्यात आहे, तर अनेक शेतांमध्ये शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी दाणे भरण्याची अवस्था सुरू असून, हा पिकासाठी अत्यंत निर्णायक टप्पा आहे. मात्र, याच काळात पावसाने दडी मारल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

येत्या चार-पाच दिवसांत पुरेसा पाऊस न झाल्यास उरलेले सोयाबीन पीकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. मोठ्या कष्टाने व वाढत्या उत्पादन खर्चाचा भार सहन करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पिके उभी केली. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे पेरण्या रखडल्या, तर काही ठिकाणी पेरणीनंतरच पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.

पाण्याच्या ताणामुळे अनेक ठिकाणी पिके माना टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ऊस पिकालाही पाण्याच्या ताणाचा मोठा फटका बसला आहे. वाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने उसाची उंची व जाडी वाढण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

परिणामी, उसाच्या वजनावर तसेच पुढे साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधी पावसाची अनिश्चितता, त्यानंतर पावसाने दिलेला दगा आणि आता बदलत्या वातावरणामुळे अळी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव अशा दुहेरी-तिहेरी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

परिसरातील काही भागात सोयाबीनवर यलो मोॉकसारख्या रोगांचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. जून व जुलै महिना उलटून गेला असून आता ऑगस्टचा शेवट आला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी परिसरातील पाण्याचे स्रोतही कोरडे पडत असून शेतीबरोबरच पशुधन जगवण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा आणि पुढील वर्षाचा संसार कसा चालवायचा, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. आता परतीचा पाऊसही वेळेवर आणि समाधानकारक झाला नाही, तर आगामी रब्बी हंगामावरही संकट येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. त्यामुळे तांदुळजा परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची प्रतीक्षा अधिकच तीव्र झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT