'Joyful Reading Kits' Presented to Six Zilla Parishad Schools in Latur District
लातूर, पुढारी वृत्तसेवाः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे तसेच वाढत्या मोबाईल वापरामुळे निर्माण होणाऱ्या व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीने लातूर जिल्ह्यात 'आनंदी वाचनपेटी' उपक्रम राबविण्यात आला.
लातूर तालुक्यातील मुरुड (अकोला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील मुरुड (अकोला) शाळेसह हालसीवाडी सांगवी, वांगजी, मासुर्डी, एकंबी या जिल्हा परिषद शाळांच्या ग्रंथालयांना लोकसहभागातून प्रत्येकी ८० पुस्तकांची 'आनंदी वाचनपेटी' प्रदान करण्यात आली.
या 'आनंदी वाचनपेटी 'मध्ये कथा, कविता संग्रह, महापुरुष व शास्त्रज्ञांची चरित्रे तसेच विविध विषयांवरील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके समाविष्ट असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी एचएआरसी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अति वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मोबाईलवर जास्त वेळ घालवण्याऐ वजी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी, दररोज किमान एक तास वाचन करावे तसेच वाचलेले लिहिण्याची व व्यक्त करण्याची सवय लावावी, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चांगल्या व्यक्तिमत्व व चारित्र्य विकासासाठी ३० चांगल्या सवयी अंगीकारण्याचा संदेशही देण्यात आला.
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीने लोकसहभागातून आजवर संभाजीनगर, नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, पुणे, नाशिक व वाशिम जिल्ह्यातील तब्बल १९१ जिल्हा परिषद शाळांना 'आनंदी वाचनपेटी' भेट देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या प्रसंगी मुख्याध्यापक अंकुश सूर्यवंशी (मुरुड-अकोला), तानाजी हजारे (सांगवी पूर्व, ता. निलंगा), हभप अमोल शेळके (मासुर्डी, ता. औसा), दत्तात्रय रत्नपारखे (हालसीवाडी, ता. निलंगा), संजय राठोड (एकंबी, ता. औसा) तसेच आप्पासाहेब पांचाळ (वांगजी, ता. औसा) उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तात्रय रत्नपारखे यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब जगधने यांनी केले. आभार हभप अमोल शेळके यांनी मानले.