जळकोट : नगर पंचायत, जळकोटच्या हद्दीतील वार्ड क्रमांक १४ मध्ये शासकीय जागेवरील अतिक्रमण आणि बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या तळलेल्या खाद्यपदार्थ निर्मिती कारखान्याविरोधात नागरिकांनी संतप्त भूमिका घेतली आहे.
संबंधित व्यक्तीने मालमत्तेच्या मयदिबाहेर जाऊन सार्वजनिक रस्ता व शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्ती गेल्या १० ते १५ वर्षांपासून निवासी वस्तीच्या मध्यभागी कोणतीही वैध परवानगी न घेता तळलेले खाद्यपदार्थ तयार करण्याचा कारखाना चालवत आहे. ना नगर पंचायतीची परवानगी, ना प्रदूषण नियंत्रण मंडळाची. अशा परिस्थितीत हा उद्योग सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कारखान्यातून निघणारा दाट धूर, दुर्गंधीयुक्त वायू आणि प्रदूषित हवा यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार हा प्रकार पर्यावरण संरक्षण अधिनियम, वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम यांचे उल्लंघन करणारा आहे. याशिवाय भारतीय दंड संहिता १८६० नुसार हा प्रकार दंडनीय ठरू शकतो, असे म्हटले आहे.
नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तात्काळ पंचनामा करून शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. तसेच बेकायदेशीर कारखान्याची सखोल तपासणी करून आवश्यक परवानग्या नसल्यास तात्काळ सील करण्याची कारवाई करावी, मागील १०-१५ वर्षांच्या बेकायदेशीर कारभाराबद्दल दंडात्मक व फौजदारी कार्यवाही सुरू करावी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिविर आयोजित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास वार्ड क्रमांक १४ मधील सर्व नागरिक लोकशाही मार्गान तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर चंद्रकांत कुनके, किसन चिखले, रमाकांत मठ्ठदेवरु, सुधाकर बुक्के, अप्पाराव चांडोळकर, अॅड. अमोल कळसे, तिलमिलदार यांसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
काहींनी कोणतीही परवानगी नसताना राजकीय पुढारी, अधिकारी यांना हाताशी धरुन भर नागरी वसाहतीत धुरकट उद्योग थाटले आहेत. दररोज निघणाऱ्या या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे तसेच डोळ्याचे आजार जडत आहेत. या नियमबाह्य उद्योगामुळे नागरिकांच्या आरोग्याला घेका निर्माण झाला आहे.