In the Nilanga municipality, the BJP has gained absolute power after the election of the mayor and 15 councilors
निलंगा, पुढारी वृत्तसेवा: निलंगा नगरपालिकेत नगराध्यक्षांसह १५ नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. शहरातील जन-तेने दाखवलेला विश्वास व लाडक्या बहिणी यांचा सन्मान करण्यासाठी निलंगा नगरपालिकेत सर्व विषय समित्यांवर महिलांना संधी देऊन भाजपने महिलाराज आणले आहे.
निलंगा नगरपालिकेच्या कारभारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष संजयराव हलगरकर तर नियोजन समितीच्या अध्यक्षपदी फुलारी आशाताई रविशंकर, बांधकाम सभापती म्हणून मोहोळकर पूजाताई दत्तात्रय, पाणीपुरवठा सभापतीपदी हाडोळे सोनालीताई गोपाळराव, स्वच्छता आरोग्य व दिवाबत्ती सभापतीपदी वाघमारे सुधाताई मारुती, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निलंगेकर मीनाक्षी शरदराव तर उपसभापतीपदी कांबळे रंजनाताई यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर तसेच नगराध्यक्ष संजयराज हलगरकर, गटनेते वीरभद्र स्वामी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या विषय समितीच्या निवडी वेळी सर्वच नगर सेवक उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष संजयराज हलगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी तसेच मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी कामकाज पाहिले.
महिलाराज आणून लाडक्या बहिणींचा सन्मान
निलंगा शहरातील जनतेने दाखवलेला विश्वास लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठीच माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी पालिकेचा कारभार करण्याची संधी महिलांना उपलब्ध करून दिली. महिला सुद्धा कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये कमी असणार नाहीत. पालिकेचा कारभार सक्षमपणे महिला चालवू शकतात, यासाठीच सर्व विषय समित्या महिलांच्या हाती सोपवल्या आहेत.