In Latur district, 661 candidates are in the election fray.
लातूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ च्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतरही जिल्ह्यात एकूण ६६१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
यात लातूर आणि निलंगा तालुक्यात सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार असून, तिथे हाय व्होल्टेज लढती अपेक्षित आहेत. निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या अंतिम आकडेवारीनुसार, छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २४२ उमेदवार तर पंचायत समितीच्या गणांसाठी तब्बल ४१९ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. या प्रक्रियेत माघारीचे प्रमाणही लक्षणीय राहिले. जिल्हा परिषदेसाठी दाखल अजपैिकी एकूण २१० उमेदवारांनी, तर पंचायत समितीसाठी ३५४ उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी थंड झाली आहे.
निलंगा तालुक्यात विक्रमी गर्दी : जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यात सर्वाधिक ४१ उमेदवार एकट्या निलंगा तालुक्यात आहेत, त्यामुळे येथे प्रत्येक गटात चुरशीची लढत होणार आहे.
लातूरमध्ये पंचायत समितीसाठी रेकॉर्ड : लातूर तालुक्यातून पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सर्वाधिक ७० उमेदवार रिंगणात आहेत.
उदगीरमध्ये बंड थंड : उदगीर तालुक्यात माघारीचे प्रमाण मोठे राहिले. येथे जि.प. साठी ३९ आणि पं.स. साठी ६८ जणांनी माघार घेतल्याने चित्र काहीसे स्पष्ट झाले आहे.
औसा तालुक्यात चुरस : औसा तालुक्यातही पंचायत समितीसाठी ६३ उमेदवार नशीब आजमावत असल्याने लढती अटीतटीच्या होणार आहेत.