If aid is to be provided across the board, then why conduct damage assessments? Farmers' question
रेणापूर पुढारी वृत्तसेवा : अवर्षणामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम थेट खात्यात जमा करण्याचे आश्वासनही देण्यात आले. मग सरसकट मदत देणार असाल तर पिकांचे पंचनामे कशासाठी केले, असा सवाल रेणापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. त्यातच रेणापूर सेवा सहकारी संस्थेच्या १ हजार ४२८ शेतकऱ्यांची २०१७ पासून कर्जमाफी रखडली असून, त्यांनाही अद्याप लाभ मिळालेला नाही.
खरीप हंगाम २०२६ मध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने रेणापूर तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील ५१ हजार ८६२ शेतकरी बाधित झाले असून, ४५ हजार ४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदतीसाठी ४५ कोटी ९६ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल तहसील प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे.
फार्मर आयडी काढलेल्या शेतकऱ्यांची माहितीही शासनाकडे अपलोड करण्यात आल्याचे तहसील व कृषी विभागाकडून सांगण्यात आले. रेणापूर तालुका दुष्काळी जाहीर झाल्यानंतर रेणापूर, पानगाव, पळशी, कारेपूर आणि पोहरेगाव या पाच महसूल मंडळांत मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामार्फत युद्धपातळीवर पंचनामे करण्यात आले.
प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकरी व दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत पंचनामे करण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, आठ अनुसार क्षेत्र, बाधित गट क्रमांक, पिकाचे नाव, बाधित क्षेत्र, नुकसानीची टक्केवारी, फार्मर आयडी, बँक खाते आदी तपशील नोंदविण्यात आले. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, रेणापूर सेवा सहकारी संस्थेच्या १ हजार ४२८ सभासद ८८५ शेतकऱ्यांची २०१७ पासून कर्जमाफी झालेली नाही. यापैकी शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यासाठी बँकेमार्फत संस्थेकडे पाठविण्यात आली आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पोर्टल बंद असल्याने माहिती अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. आमच्या कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार, असा सवाल सभासद शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे सरसकट मदतीची घोषणा आणि दुसरीकडे पंचनामे व विविध कागदपत्रांची प्रक्रिया यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुष्काळाने आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे आणि कागदपत्रांच्या अटींमध्ये अडकवू नये. पंचनाम्यांच्या अटी न घालता सर्व बाधित शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, तसेच कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या १ हजार ४२८ शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
सोयाबीनचे ३६ हजार ५८९ हेक्टर क्षेत्र बाधित
रेणापूर तालुक्यात सोयाबीनचे ३६ हजार ५८९ हेक्टर, ऊस ७ हजार २८८ हेक्टर, तूर ४७२ हेक्टर, भाजीपाला २२१ हेक्टर, हळद १८४ हेक्टर, आंबा १६९ हेक्टर, केळी ७५ हेक्टर, पपई ३० हेक्टर, कांदा ३२ हेक्टर, चिकू १२ हेक्टर, डाळिंब १४ हेक्टर, मोसंबी सात हेक्टर, द्राक्षे पाच हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याशिवाय मका सात, ज्वारी २२, मूग २२, उडीद १६, कापूस १३ हेक्टर तसेच इतर पिकांचेही नुकसान झाले आहे.