Water scarcity : पाणीटंचाईचे संकट; माणसांसह जनावरांचीही भटकंती

रेणापूर : रेणा प्रकल्पात अवघा १८ टक्के साठा; गावोगावी पाणी टाक्या, जनावरांसाठी हौद उभारण्याची मागणी
Water scarcity
Water scarcity : पाणीटंचाईचे संकट; माणसांसह जनावरांचीही भटकंतीfile photo
Published on: 
Updated on: 

Water scarcity crisis; both humans and animals forced to wander in search of water

विठ्ठल कटके

रेणापूर : रेणापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. रेणा मध्यम प्रकल्पात अवधा १८ टक्के जलसाठा शिल्लक असून व्हटी प्रकल्पासह तालुक्यातील पाझर तलाव आणि रेणा नदीवरील बॅरेजेस कोरडे पडले आहेत. पाण्याचे स्रोत आटत चालल्याने माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात पाच ते दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, तसेच जनावरांसाठी सिमेंटचे हौद उभारावेत, अशी मागणी होत आहे.

Water scarcity
Tirru River Water Storage : तिरू नदीवरील बंधारे दुष्काळात कोरडेच!

तालुक्यातील २१ गावांमध्ये २८ विहिरींचे अधिग्रहण करून सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने इतर गावांमध्येही पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावातील चौकाचौकांत पाण्याच्या टाक्या उभारून त्यात टँकरद्वारे पाणी भरावे. जनावरांसाठी सिमेंटचे हौद ठेवून त्यात नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

धाराशिव जिल्हा प्रशासनाने जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर रेणापूर तालुक्यातही हा उपक्रम राबविल्यास माणसे आणि जनावरांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत होईल. दुष्काळामुळे शेतीची कामे ठप्प होत असून मजुरांच्या हाताला गावात काम मिळत नसल्याने अनेकजण वीटभट्टी आणि ऊसतोडणीसाठी बाहेरगावी स्थलांतर करीत आहेत. हे स्थलांतर रोखण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

Water scarcity
Latur Lost Mobile Recovery : महिनाभरात शोधले ३४ मोबाईल; शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

बचत गटांतील महिलांना लघुउद्योगांसाठी कर्जपुरवठा करून गावातच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकीकडे खरीप हंगाम हातातून गेला असून रब्बी हंगामाबाबतही शेतकऱ्यांच्या आशा मावळत आहेत. दुसरीकडे धान्य, डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

ज्वारीचे दर सात ते आठ हजार रुपये, हरभरा सात ते आठ हजार, तूर आठ ते नऊ हजार, मूग आठ ते नऊ हजार, उडीद नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. सोयाबीनचे दर सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. डाळींच्या किमतीतही वाढ झाली आहे.

जनावरांचा चारा महागल्याने दूध उत्पादनाचा खर्च वाढला असून दुधाचे दर प्रतिलिटर ८० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पाणीटंचाई, शेतीतील अनिश्चितता आणि वाढती महागाई अशा दुहेरी संकटात शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सापडले आहेत. दिवाळीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या परिस्थितीत सण साजरा करायचा कसा, असा प्रश्न ग्रामीण भागातील कुटुंबांसमोर उभा आहे. प्रशासनाने पाणीपुरवठा, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था आणि ग्रामीण रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

पाण्यासह रोजगाराचीही गरज

रेणा प्रकल्पात १८ टक्के जलसाठा असताना २१ गावांतील २८ विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू आहे. गावोगावी पाण्याच्या टाक्या व जनावरांसाठी सिमेंटचे हौद उभारण्याची गरज आहे. पाण्याअभावी शेतीची कामे ठप्प झाल्याने मजुरांचे स्थलांतर वाढत आहे. बचत गटांना लघुउद्योगांसाठी कर्जपुरवठा करून गावातच रोजगार उपलब्ध केल्यास स्थलांतर रोखण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.