Trauma Care Unit : आणखी किती बळी गेल्यास सुरु होणार ट्रॉमा केअर युनिट ? File Photo
लातूर

Trauma Care Unit : आणखी किती बळी गेल्यास सुरु होणार ट्रॉमा केअर युनिट ?

चाकूर ट्रामा केअर ७ वर्षांपासून निधीअभावी अर्धवट; अपघातग्रस्तांचे प्राण धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

How many more lives will be lost before the trauma care unit is started?

संग्राम वाघमारे

चाकूर : लातूर-नांदेड महामार्गावर वसलेल्या चाकूर येथील ट्रॉमा केअर सेंटर आणखी किती बळी गेल्यास पूर्ण होणार ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ट्रॉमाचे ७ वर्षांनीही काम होत नसल्याने निधीअभावी ती इमारत ओस पडली आहे. या महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातग्रस्तांचे प्राण धोक्यात आले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

शुक्रवारी चाकूरपासून चापोलीकडे जाणाऱ्या एका मोटार सायकलस्वरास चारचाकी वाहनाने उडवले. त्यात मोटारसायकलवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना लातूरला उपचारासाठी दखल करण्यात आले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर अपघातात झाल्यानंतर जखमीना 'गोल्डन अवर 'मध्ये तातडीच्या उपचारांची आवश्यकता असताना चाकूरमध्ये सक्षम ट्रॉमा सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना थेट लातूर येथे हलवावे लागत आहे. या विलंबामुळे अनेक वेळा रुग्णांची प्रकृती गंभीर बनून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचे वास्तव लपून राहिलेले नाही. २०१४ ला येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या कामासाठी मंजूरी मिळाल्यानंतर २०१८ ला तांत्रिक मान्यता मिळून २०१९ पासून कामाला सुरुवात झाली.

या कामासाठी शासनाकडून ४ कोटी ५ लाखांचा खर्च केला गेला. परंतु या निधीमध्ये ट्रामा सेंटरचे काम पूर्ण झाले नाही. उर्वरित कामासाठी जवळपास २ कोटी ७ लाख रुपयाची आवश्यकता आहे. मुंबईच्या एका कंपनीला सदरील काम सुटले आहे, या कामास २४ नोव्हेंबर २०२० अन्वये २५ एप्रिल २०२१ पर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आली होती. दोन वर्षाच्या कालावधीनंतर २०२२ ला दुसरी मुदतवाढ दिली. तिसरी मुदत ३१ मार्च २०२३ ला वाढीचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता लातूर यांनी मुख्य अभियंता नांदेड यांना दिला आहे.

या कामासाठी आतापर्यंत ४ कोटी ७ लाख रुपये खर्च झाला आहे. उर्वरित दरवाज्याचे पट बसविणे, प्लम्बिंगचे काम, सेप्टीक टँकचे काम व साडपाणी पाईप लाईन, चेंबर्स, रंगकाम करणे व इतर किरकोळ कामे करणे बाकी आहे. तसेच या परिसरात सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करणे, पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण करणे, पंपहाऊस पाण्याच्या टाकीसह बांधणे, ध्वजस्तंभाचे बांधकाम करणे, वॉचमनसाठी खोली काम करणे, वाहनतळाचे बांधकाम करणे व जुने बांधकाम पाडणे ही कामे करणे बाकी असून यासाठी २ कोटी ७ लाख रुपये वाढीव निधीची आवश्यकता असून त्या निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाने केली आहे.

या निधीच्या आभावामुळे चाकूरचे ट्रामा केअर अपूर्ण असून सध्या ही इमारत ओस पडलेली आहे. एकीकडे शासन आरोग्य सुविधा बळकट करण्याचे दावे करत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र अपघातग्रस्त रुग्णांना प्राथमिक अत्यावश्यक उपचारही मिळत नसल्याचे विदारक चित्र चाकूरमध्ये दिसून येत आहे. चाकूरसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे ट्रामा केअर जीवनदायी ठरू शकते. मात्र, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे व निधी वितरणातील उदासीनतेमुळे हे केंद्र केवळ 'शासनाच्या अपयशाचे प्रतीक' बनत चालले आहे.

या गंभीर बाबीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन निधी मंजूर करावा, रखडलेले बांधकाम तत्काळ पूर्ण करावे अन्यथा वाढत्या अपघातांना शासनाची जबाबदारी ठरवली जाईल, असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान वैद्यकीय अधिक्षक डॉ जयस्वाल यांच्याशी संपर्क केला असता. प्रथम ट्रामाचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे. बाकी वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आरोग्य विभागाची असल्याचे सांगितले.

ट्रॉमा केअर युनिटच्या अपूर्ण कामामुळे रुग्णाला आरोग्य सुविधांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ रुग्णांवर आलेली आहे. आज चाकूर येथील दोन युवकांचा चापोलीकडे जाताना भीषण अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. त्यामध्ये पपन मोठेराव याचा मृत्यू झाला आहे. ट्रामा केअरचे काम पूर्ण झाले असते तर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले असते.
पपन कांबळे, तालुकाध्यक्ष रिपाई, चाकूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT