Devni stolen gold jewelry
देवणी : विळेगाव (ता. देवणी) येथे धाडसी घरफोडी झाली असून चोरट्यांनी तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना दि. २७ ते २८ च्या मध्यरात्री घडली. एका शेतकऱ्याच्या घरातून तब्बल ९ लाख ९८ हजार ७०१ रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घरफोडी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किशन विठ्ठलराव पाटील (वय ७२, रा. विळेगाव, ता. देवणी) यांनी देवणी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ते २८ ऑक्टोबर रोजी पहाटे २ या वेळेत त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. कपाट तोडून व लेन्टनवरील बॅग फाडून त्यातील सोन्याचे दागिने चोरीस नेले. घरात कोणी नसल्याने चोरट्याने संधी साधली.
एकूण २४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यात विविध अंगठ्या, झुमके, बोरमाळ, नेकलेस, पवळे हार, गोपला, लाकेट, मिनी गंठण, इत्यादींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ९ लाख ९८ हजार ७०१ इतकी आहे. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर विळेगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांकडून रात्री गस्त वाढविण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व संशयितांची चौकशी सुरू आहे.