Heavy rains in Ahmedpur taluka affect crops on 43 thousand hectares
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली असून, नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आतापर्यंत ४३००० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे आणि गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी बाधित भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.
अतिवृष्टीमुळे केवळ शेतीतच नाही, तर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. १०१ कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे अन्नधान्य, कपडे आणि भांडी यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी स्तरावर या सर्व कुटुंबांचा सर्व्हे सुरू आहे. घरपडझड देखील बऱ्याच ठिकाणी झाली असून त्यात पक्की घरे चार पूर्णतः कोसळली आहेत, तर ८१ घरे अंशतः बाधित झाली आहेत. तसेच कच्ची घरे ७४ अंशतः पडझड झाली आहे. पडझड झालेल्या घरांचा सर्व्हे ग्रामसेवक यांचेमार्फत करण्यात येत आहे. या संकटात पशुधना चेही नुकसान झाले आहे. यात तीन मोठी दुधाळ आणि एक दुधाळ जनावराचा मृत्यू झाला आहे.
तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी सांगितले की, नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांची पथके नेमण्यात आली आहेत. आतापर्यंत ६०% पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल आणि त्यानंतर शासनाच्या नियमानुसार बाधित नागरिकांना व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.