Heavy rain in Bhise-Wagholi and surrounding areas; crops get a new lease of life
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोलीसह परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
यंदाच्या जून महिन्यापासून प्रथमच एवढ्या जोरदार पावसाची नोंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहिल्यास परिसरातील नदी, नाले आणि ओहे तुडुंब भरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पिकांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, ज्या भागात अद्याप पेरण्या झाल्या नव्हत्या, तेथेही या पावसामुळे पेरणीला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. ही माहिती सत्तार पटेल यांनी दिली.