He murdered his friend after demanding that he be given alcohol today
लातूर, पुढारी वृत्तसेवा :
काल तुला दारू पाजली होती, आज तू मला पाज, असा तगादा लावत मित्राने पैसे मागितले. मात्र, "एवढ्या सकाळी पैसे नाहीत, उद्या पाजतो, असे म्हणताच संतापलेल्या मित्राने डोक्यात जड फरशी घालून तरुणाचा जागीच खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली. बुधवारी (दि. २१) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा थरार घडला. अनिल दोडके (वय ४०) असे मयताचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्र योगेश मुंडे (वय २८) याला काही तासांतच अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनिल दोडके आणि आरोपी योगेश मुंडे हे दोघेही शहरातील खाडगाव रोड परिसराचे रहिवासी असून एकमेकांचे मित्र होते. दोघेही मजुरीचे काम करतात. कामाच्या शोधार्थ ते बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते. यावेळी योगेशने अनिलकडे दारूची मागणी केली. काल मी तुला पार्टी दिली, आता तुझी पाळी आहे, असे तो म्हणाला. मात्र, अनिलने सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, उद्या बघू," असे सांगत नकार दिला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने अनिलला शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मयताचे सासरे सदाशिव राजाराम कांबळे (रा. खाडगाव रोड, लातूर) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात योगेश मुंडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या असून, पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण पुढील तपास करत आहेत.
भरचौकात रक्ताचा सडा
नकार मिळताच योगेशचा पारा चढला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात योगेशने रस्त्यावर पडलेली एक जड फरशी (दगड) उचलून ती थेट अनिलच्या डोक्यात घातली. हा घाव इतका वर्मी लागला की, अनिल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.