

लातूर : वीस वर्षांपूर्वी म्हणजे 17 जुलै 2006 रोजी कारमधून टेप चोरलेल्या आरोपीस लातूर पोलिसांनी औसा तालुक्यातील कमालपूरउजनी शिवारात सापळा रचून पकडले. त्यास न्यायालयात हजर केले असता 27 जानेवारी पर्यंतची न्यायालयीन कोठडी मिळाली.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, अरविंद विठ्ठलराव भोसले (रा. शाहूपुरी कॉलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 10 जुलै 2006 रोजी रात्री 10 वाजता त्यांच्या घरासमोर उभी केलेल्या अम्बेसेडर कार( क्र. एमइक्यू-1561) मधून पॉईनर कंपनीचा चार हजार रुपये किंमतीचा कारटेप अज्ञात चोरट्याने चोरी केला होता.
यावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपी बाबु लक्ष्मण संकोळे (वय 41, रा. बुधोडा, ता. औसा) यास 14 जुलै 2006 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तो न्यायालयात वारंवार अनुपस्थित राहू लागला. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले व अखेर सदर केस सुप्त संचिकेत ठेवण्यात आली. आरोपी गेली 20 वर्षे सतत आपले वास्तव्य बदलून कायद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होता.
कमालपूरउजनी शिवारात उसतोडीचे काम करीत असल्याची गुप्त माहिती 19 जानेवारी रोजी अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या विशेष पथकास मिळाली. त्या आधारे विशेष पथकातील सपोनि शिवशंकर मनाळे, पोलिस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे, योगेश गायकवाड, श्रीकांत कुंभार यांनी सापळा रचून आरोपीस अटक केली. न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.