Catch the Rain Campaign : रेणापूर तालुक्यात भूजल पातळीत मोठी घट File photo
लातूर

Catch the Rain Campaign : रेणापूर तालुक्यात भूजल पातळीत मोठी घट

'कॅच द रेन' अभियान प्रभावीपणे राबविण्याची गरज; लोकसहभाग आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

Groundwater level drops sharply in Renapur taluka

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : बदलते हवामान, वाढते तापमान आणि घटते पर्जन्यमान यामुळे रेणापूर तालुक्यात यंदा पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. भूजल पातळीत झालेली लक्षणीय घट आणि जलसाठ्यांतील कमी झालेला पाणीसाठा लक्षात घेता पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्यासाठी 'कॅच द रेन', 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

रेणापूर तालुक्यात यंदा उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ झाली असून रेणा, व्हटी प्रकल्प तसेच रेणा नदीवरील बॅरेजमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातच अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार, मागील वर्षी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत तालुक्यातील भूजल पातळीत २.६१ मीटरची वाढ नोंदविण्यात आली होती. मात्र, यावर्षी ही वाढ केवळ ०.३३ मीटर इतकीच राहिली आहे. यावरून भूजल साठ्यात मोठी घट झाल्याचे स्पष्ट होत असून भविष्यात पाणीपुरवठ्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

यापूर्वी प्रशासनाकडून रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण योजनांसाठी विविध स्तरांवर जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. मात्र, या उपक्रमांना अपेक्षित लोकसहभाग मिळाला नाही. त्यामुळे शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत 'कॅच द रेन' अर्थात जलशक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि भूजल पुनर्भरणाला चालना देणे यावर भर दिला जात आहे. सरकारी व खासगी कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच निवासी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी करणे काळाची गरज बनली आहे. गावागावांतील लहान ओढे, नाले, पाणीसाठे आणि पाणी वाहून जाणाऱ्या ठिकाणांचे पुनर्भरण करण्यासाठीही विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतांमधील पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविण्यासाठी शेततळे, शोषखड्डे, बंधारे आणि चर उभारण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

प्रशासनासोबतच नागरिकांनीही या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास भूजल पातळी वाढवून भविष्यातील पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT