Gram Panchayat tax exemption for families who admits their children in Z.P. schools
निलंगा, पुढारी वृत्तसेवा :
ग्रामीण भागातील पालकांमध्ये शहरातील इंग्रजी शाळा व खासगी शाळांच्या वाढत्या आकर्षणामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होऊन भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतील असे चित्र तयार होत आहे.
ते टाळण्यासाठी व जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी निलंगा तालुक्यातील सिदखेडची ग्रामपंचायत सरसावली असून जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देतील त्या कुटुंबाला ग्रामपंचायतकडून करमाफी देण्याचा निर्णय या ग्रामपंचायतीने घेतला आहे.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी गावचा कारभार युवकांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला. निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथील ग्रामस्थांनी व सरपंच म्हणून नागनाथ आंबिलपुरे यांना तसेच त्यांच्या पॅनलला निवडून दिले. ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यात रावसाहेबव आंबिलपुरे यांनी गावच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर आणि आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे प्रयत्न करून मोठा विकासनिधी मंजूर करून घेतला.
गावात मुबलक पाण्याची व्यवस्था, केली, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. नवीन तलाठी कार्यालय रस्ते केले. गावातील मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामपंचायतच्या वतीने २१०० रुपये देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.
तसेच मागच्या काही वर्षांपासून पालक आपल्या मुलांना निलंग्याला इंग्रजी व खाजगी शाळेत पाठवत असल्याने गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वर्षानुवर्षे कमी कमी होत चालल्याने व शिक्षकांची संख्या कमी होऊन शाळा बंद पडण्याची परिस्थिती उदभवण्याची शक्यता असल्याने शाळेची गुण-वत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना येथील शिक्षकांना देत गावची शाळा टिकवण्यासाठी कोणीच आपल्या पाल्यांच्या टिसी काढू नये असे आवाहन पालकांना करत यंदाच्या वर्षी जे पालक जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश करतील त्या कुटुंबाला ग्रामपंचायत कर माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.