Rice parcel case | तांदूळ पार्सल प्रकरणी मुख्याध्यापिकेवर अनियमिततेचा ठपका
School rice distribution issue
चाकूर : येथील एका शाळेत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना शिजवून देण्याच्या नियमाला चक्क बगल देत मुख्याध्यापिकेने तांदूळ पार्सल दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात मुख्याध्यापिकेवर अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
चाकुरातील भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयात प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना २९ मार्च रोजी तांदळाचा खाऊ शिजवून देण्याऐवजी चक्क पार्सल देण्यात आला होता.
हा प्रकार गटशिक्षणाधिकारी यांना व्हिडीओद्वारे कळल्यानंतर त्यांनी शाळेला भेट देवून पंचनामा करून शालेय पोषण आहाराचा तांदळाचा स्टॉक तपासला. त्याची दुसऱ्यादिवशी केंद्रप्रमुख यांच्या पथकानेही पाहणी करून नोंदी घेतल्या होत्या. त्यांचा अहवाल तयार करून गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिला.
दरम्यान गटशिक्षणाधिकारी यांनी तो अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला. त्या संदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतील तांदुळ व डाळ विद्यार्थ्यांना वाटप केले बाबतचा संयुक्त समितीचा अहवाल कार्यालयास सादर केला.
या चौकशी अहवालानुसार त्या प्रकरणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून संबंधित मुख्याध्यापक यांना दोन लाख एकोणचाळीस हजार नऊशे तेहतीस रुपये वसुलपात्र रक्कम शासनखाती भरणा करण्याविषयी या कार्यालयाकडून कळविण्यात आल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे तांदूळ पार्सल प्रकरणात मुख्याध्यापिका यांनी अनियमितता व गैरव्यवहार केल्याचे २९ मे २०२५ रोजीच्या प्राप्त अहवालात म्हटले आहे.
मी कसलीही अनियमितता आणि गैरव्यवहार केला नाही : मुख्याध्यापिका संजीवनी पवार
दरम्यान, मुख्याध्यापिका संजीवनी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला अद्याप पत्र मिळाले नाही. मला पत्र प्राप्त झाल्यानंतर मी वरिष्ठाकडे दाद मागणार आहे. या प्रकरणात मी कसलीही अनियमितता आणि गैरव्यवहार केला नाही. त्यामुळे एवढी अधिकची वसुल रक्कम भरण्याचा विषय येत नाही, ते मला भरणे शक्य नाही, असे 'पुढारी'शी बोलताना त्यांनी सांगितले.

