Governor Jishnu Dev Varma conducts an inspection in Anandwadi, Naigaon; interacts with farmers
चाकूर, पुढारी वृत्तसेवा पावसाअभावी उजाड झालेली शेतशिवारं, पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न... अशा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. १९) चाकूर तालुक्यातील आनंदवाडी आणि नायगाव येथे भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या दौऱ्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांना शासनाच्या सर्वोच्च स्तरावर वाचा फुटण्याची आनंदवाडी येथे राज्यपालांनी शेतकरी सुनीता पस्तापुरे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर नायगाव येथे सरपंच प्रतिनिधी श्रीनाथ सावंत यांनी दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची व्यथा मांडली.
पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याकडे त्यांनी लक्ष वेधले. गावकऱ्यांनी कायमस्वरूपी पाणीपुरवठा आणि चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या परिस्थितीची पाहणी करून काहीही न बोलता परत जाण्याचे ठरवले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर बोलावेसे वाटले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचणे हे माझे कर्तव्य आहे, अशा शब्दांत राज्यपालांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
नुकसानभरपाई, कर्जमाफी, रोजगाराच्या आणि योजना जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यपालांनी आनंदवाडी साठवण तलावातील पाणीसाठ्धाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप व ट्रॅक्टर आणि कडबा कुट्टी यंत्रांचे वितरण करण्यात आले.
चारा लागवड उपक्रमासाठी महांडोळ येथील ज्ञानदेव नागनाथ मुंडे आणि नितीन सत्यवान मुंडे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कलकोटी येथील मंदूबाई डावरे यांना सावकाराच्या ताब्यात गेलेली साडेचार एकर जमीन परत मिळाल्यानंतर त्यासंबंधीचा सातबारा सुपूर्द करण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण, जलतारा प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच मनरेगातून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
नदीजोड प्रकल्पातून दुष्काळावर कायमस्वरूपी उपायाची अपेक्षा
चाकूर-अहमदपूर तालुक्यांतील दुष्काळाची तीव्रता मांडताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नदीजोड प्रकल्पासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतून दुष्काळी भागाला कायमस्वरूपी दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या प्रकल्पासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये : पालकमंत्री
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही नदीजोड प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. दुष्काळी भागाला कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी दीर्घकालीन जलव्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये आणि कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन करत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.