For the municipal corporation elections, political parties are focusing on meetings and interviews.
लातूर, पुढारी वृत्तसेवा लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबधणी सुरु केली आहे. भाजपा काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शिवसेना व अन्य राजकीय पक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. भाजपाने ९०० पेक्षा अधिक, काँग्रेसनेही ६५० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाने वीस जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर अन्य राजकीय पक्षांनी बैठकांवर जोर दिला आहे.
भाजपाने चार दिवसांपूर्वी इच्छुक ९०० पेक्षा अधिक उमेदवार यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती दोघांचे असे चार पॅनल तयार करून घेण्यात आल्या. यामध्ये माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गुरुनाथ मागे देविदास काळे प्रेरणा होनराव, सुधीर धुत्तेकर, शैलेश गोजमगुंडे, दीपक मठपती यांनी मुलाखती घेतल्या. सर्व उमेदवारांची माहिती प्रदेश भाजपकडे पाठवण्यात आली असून, प्रदेशच्या वतीने उमेदवार निवडीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार निकषात बसणाऱ्या पात्र उमेदवारींची निश्चिती होईल आणि त्यानंतर प्रदेशकडूनच उमेदवारींची घोषणा होईल, असे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले. काँग्रेसने माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, खा. डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १७ व १८ डिसेंबर रोजी काँग्रेस भवन येथे साडेसहाशे पेक्षा अधिक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
या मुलाखतीच्या निवड प्रक्रियेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ. जितेंद्र देहाडे, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, प्रदेश सचिव अॅड. ऍड. समद पटेल, माजी महापौर अॅड. दीपक सूळ, माजी महापौर प्रा.डॉ. स्मिताताई खानापुरे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, सेवादल शहराध्यक्ष सुपर्ण जगताप, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अॅड. फारुक शेख, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत धायगुडे, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांनी मुलाखती घेतल्या.
कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती लातुर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर शहर यांच्या वतीने आढावा बैठक राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परवा झाली. संघटन मजबूत करणे, तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचणे, विकासाच्या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करणे व एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा संदेश त्यांनी दिला.
महाराष्ट्र विकास आघाडीची आढावा बैठक व उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. अण्णाराव पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंत आप्पा उवाळे, नेते इस्माईल फुलारी व जिल्हाध्यक्ष नाजम भाई शेख यांच्या उपस्थितीत पार पडल्या. एकूण वीस जणांनी मुलाखती दिल्या. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठीची रणनीती, संघटनात्मक आढावा आणि उमेदवार निवड प्रक्रियेवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इच्छुकांची चाचणी चालू असून अन्य राजकीय पक्षही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.