Fire breaks out in Hadga, farmer suffers loss of Rs 20 lakh
निलंगा, पुढारी वृत्तसेवा सोयाबीन व इतर शेतीउपयोगी साहित्य ठेवलेल्या गोडाऊनमध्ये शॉट सर्कीट होऊन लागलेल्या आगीत हाडगा येथील शेतकरी सर्जेराव मोरे यांचे जवळपास २० लाखाचे नुकसान झाल्याची घटना शनिवार (दि २८) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.
निलंगा तालुक्यातील हाडगा येथील शेतकरी सर्जेराव मोरे यांच्या शेतातील गोडाऊनला शॉट सर्किट होऊन आचानक आग लागली. आग लागल्याचे सर्जेराव मोरे यांना लक्षात येताच त्यांनी शेडमधील जनावरे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांनाही दुखापत झाली.
आगीने बघता बघता रोद्ररुप धारण केले. आगीत गतवर्षी सोयाबीनला भाव नसल्याने सोयाबीन न विकता शेडमध्ये साठवून ठेवले होते. गतवर्षीचे व यंदाचे मिळून जवळपास २७० कट्टे सोयाबीन, ७० कट्टे गहू, २० कट्टे ज्वारी, इतर शेती उपयोगी साहित्य, संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले तर एक शेळी जागीच जळून खाक झाली. जवळपास २० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ धावून जात आग विझविण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष संजयराज हलगरकर यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी निलंगा नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी पाठवून दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझेपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. घटनास्थळी महावितरणचे अभियंता केंद्रे, तलाठी तावरे यांनी पंचनाम केला. आगीत जखमी झालेले शेतकरी सर्जेराव मोरे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.