Doctor negligence case Pudhari
लातूर

Udgir Doctor Case | चुकीच्या उपचाराने महिलेचा मृत्यू; उदगीरातील डॉक्टरवर तीन वर्षांनंतर गुन्हा

उदगीर शहरातील परभणीकर दवाखान्यात उपचारादरम्यान चुकीचे औषधोपचार करून निष्काळजीपणा केल्याने महिलेचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Udgir Woman Death Wrong Treatment

उदगीर : उदगीर शहरातील परभणीकर दवाखान्यात उपचारादरम्यान चुकीचे औषधोपचार करून निष्काळजीपणा केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध अखेर तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.२२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. ईसा खान, (रा. परभणीकर दवाखाना, उदगीर), असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण हरिसिंग राठोड (वय ४२, रा. भगीरथराजा नगर, जळकोट रोड, कमलेश्वर शाळेच्या पाठीमागे, उदगीर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची पत्नी सुनिता नारायण राठोड (वय ३३) यांना २६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उपचारासाठी चौबारा रोड येथील परभणीकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

फिर्यादीनुसार, त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. ईसा खान यांनी चुकीचे औषधोपचार करून उपचारात निष्काळजीपणा केला. त्यामुळे सुनिता राठोड यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मात मृत्यू क्रमांक २२/२०२३, कलम १७४ सीआरपीसी अन्वये तपास सुरू केला होता. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण आणि उपचारातील निष्काळजीपणाबाबत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील वैद्यकीय समितीकडून अहवाल मागविण्यात आला.

वैद्यकीय समितीच्या अहवालात चुकीचे औषधोपचार आणि उपचारातील निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब दिला. त्यानुसार डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कारवा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची नोंद पोलिस नाईक माने यांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT