Kidney Donate : अधिक मासात सासऱ्याने दिले किडनीचे दान file photo
लातूर

Kidney Donate : अधिक मासात सासऱ्याने दिले किडनीचे दान

अनोखी अनमोल भेट : जावयाला मिळाले नवीन जीव

पुढारी वृत्तसेवा

Father-in-law donates kidney during Adhik Maas.

जयपाल ठाकूर

औसा : भारतीलय हिंदू संस्कृतीत अधिकमासात लेक-जावयाचा सन्मान करण्याची परंपरा आहे. जावयाला धोंडे जेवणाबरोबरच नवीन कपडे, सोन्याची अंगठी किंवा इतर भेटवस्तू देऊन त्यांचा मानसन्मान केला जातो. मात्र एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावयाला अनमोल अशी भेट दिली आहे. दोन्ही किडनी निकामी झालेल्या जावयास स्वतःची किडनी दान देत सासऱ्याने जीवनदान दिले आहे. ही हृदयस्पर्शी कहानी आहे औसा तालुक्यातील आलमला येथील दयानंद कोरके आणि त्यांचे सासरे भाऊसाहेब गणपती मुदगुणे (रा. कामेगाव, ता. धाराशिव) यांची.

या विषयी अधिक माहिती अशी की, दयानंद कोरके हे औसा तालुक्यातील शिवलिंगेश्वर फार्मसी महाविद्यालयात ग्रंथपाल आहेत. विद्यार्थीप्रिय असलेल्या कोरके यांना गुटखा, दारू, सिगारेट असे कसलेही व्यसन नाही. मात्र तरीही काळाने दयानंद कोरके यांच्यावर कठोर आघात केला. त्यांच्या दोन्ही किडन्या अचानक निकामी झाल्या. किडण्या निकामी झाल्याचे समजताच संपूर्ण कोरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे आयुष्य, संसार, कुटुंब आणि भवितव्य यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशा वेळी किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता. मात्र प्रत्येकाला अवयवदाता मिळतोच असे नाही. अनेक रुग्ण हे अवयवदान मिळावे यांची लाखो रुपये घेऊन वाट पाहत राहतात.

पैसे असूनही अनेकांना हे साधन मिळत नाही. त्यामुळे या आजाराने अनेक कुटुंबे असहाय होतात. परंतु दयानंद कोरके यांच्या नशीबात काही वेगळेच होते. जीवन मरणाचा प्रश्न डोळ्यासमोर असताना त्यांच्या आयुष्यात देवदूत बनून पुढे आले ते त्यांचे खूद सासरे भाऊसाहेब गणपती मुदगुणे. त्यांना आपल्या लेकीच्या संसारावर आलेले संकट सहन झाले नाही.

आपल्या मुलीच्या डोळ्यांतील वेदना आणि जावयाची आयुष्याशी होत असलेली झुंज त्यांना पहावत नव्हती. मुदगुणे यांनी कोणताही स्वार्थ अन भीतीचा विचार न करता स्वतःची एक किडनी जावयाला दान करण्याचा निर्णय घेतला व तो प्रत्यक्ष आंमलातही आणला. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबातील सदस्यांनीही संपूर्ण पाठिंबा दिला.

छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात हे यशस्वी किडनी प्रत्यारोपन झाले. या प्रसंगी दोन्ही बाजूकडील कुटुंबिय खूपच भावनिक झाले होते. सासरे भाऊसाहेब मुदगुणे यांनी आधिक मासात आपल्या जावयाला किडणी दानाची भेट देऊन समाज आणि येणाऱ्या पिढीपुढे सासर-जावई यांचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या किडणी दानाबद्दल संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

लेकीच्या कुंकवाबरोबर संसारही वाचवला

भाऊसाहेब मुदगुणे यांनी दोन्ही किडणी निकामी झालेल्या आपल्या जावयाला स्वतःची किडणी देऊन नवीन जीवनदान तर दिलेलच. पण याच बरोबर लहानपणापासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या लेकीच्या कपाळावरील कुंकू आणि संसार दोन्ही वाचवले आहे. लेकीच्या कपाळाच कुंकू जपत आणि आपल्या जावयाला नव्याने जगण्याची संधी देत मायेचा सर्वोच्य पुरावा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही खूप मोलाची साथ दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT