Farmers have turned their backs on government procurement centers
विठ्ठल कटके
रेणापूर : अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाली आहे मागील वर्षभरात सोयाबीनचे भाव चार साडेचार हजार रुपयांवरच स्थिरावले होते डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात बाज-ारात सोयाबीनचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कांही अंशी आर्थिक लाभ होत आहे. खुल्या बाजारपेठेत शासनाच्या हमीभाव केंद्राप्रमाणे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्राकडे अक्षशहाः पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून खरेदी केंद्रावर एकही शेतकरी फिरकलेला नाही. त्यामुळे सोयाबीनची खरेदी बंद आहे. बाजारात आणखी भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
२०२१ - २२ मध्ये सोयाबिनचे भाव प्रति क्विंटल दहा हजारांपर्यंत गेले होते. त्यानंतर ते चार ते साडेचार हजारांवरच स्थिरावले. या वर्षी उत्पादन कमी झाल्याने सोयाबीनचे भाव वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती त्यानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्या पासून सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे सध्या पाच हजार ३०० रूपयांपर्यंत भाव आहेत. मागील वर्षी नोंदणी करूनहि शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे माप झाले नव्हते.
शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल ५ हजार ३२८ रुपये जाहिर केला असतांनाही कांही गरजु शेतकऱ्यांनी तोटा सहन करून बाजारात कमी भावाने सोयाबीन विकले सरकारने हमी भाव खरेदीच्या नियमामध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. प्रत्यक्षात ऑनलाईन नोंदणीसाठी विलंब झाला जाचक नियम व अटी यामुळे खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनची म्हणावी तशी नोंदणी झालेली नाही.
सोयाबीनचे भाव वाढतील असा अंदाज होता तो सफल होताना दिसत आहे. रेणापूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री रेणुका खरेदी विक्री संघ व इतर खाजगी दहा ते पंधरा खरेदी केंद्र कार्यरत आहेत या केंद्रावर गतवर्षीपेक्षा फारच कमी सोयाबीनची खरेदी झालेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर २०० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यात ५० शेतकऱ्यांच्या १ हजार १२९ क्विंटलची खरेदी झालेली आहे तसेच श्री रेणुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर १ हजार ८८२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यापैकी ५१४ शेतकऱ्यांच्या १० हजार ६९६ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.
गेल्या वर्षी खरेदी केंद्रावर २७ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती त्यातुन संघाला १० लाखाचे उत्पन्न मिळाले होते. या कमीशन मधुनच नोकरांचा पगार व संघाचा इतर खर्च भागला होता. या वर्षीही किमान २५ हजार क्विंटलची खरेदी होईल अशी अपेक्षा होती. परंतु अपेक्षेप्रमाणे सोयाबीनची खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे यावर्षी नोकरांचा पगार व इतर खर्च कसा करावा हा प्रश्न उपस्थित झाला आहे, असे श्री रेणुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माणिकराव सोमवंशी व सचिव कमलाकर सोमवंशी यांनी सांगितले.