Latur News : महाग बियाणे, स्वस्त सोयाबीन; शेतकऱ्यांच्या पदरी कर्जाचा डोंगर file photo
लातूर

Latur News : महाग बियाणे, स्वस्त सोयाबीन; शेतकऱ्यांच्या पदरी कर्जाचा डोंगर

रेणापूर : ३० कोटींचा फटका; ४६ हजार हेक्टरवरील सोयाबीन करपले, बियाण्यांवरच १८ कोटींचा खर्च

पुढारी वृत्तसेवा

Expensive seeds, cheap soybeans; farmers saddled with a mountain of debt

विठ्ठल कटके

रेणापूर : पेरणीच्या वेळी महागडे बियाणे, उत्पादनाच्या वेळी पावसाची ओढ आणि बाजारात सोयाबीनला मिळणारा कमी भाव, अशा दुहेरी कोंडीत रेणापूर तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. यंदा ३० किलो सोयाबीन बियाण्याच्या एका पिशवीसाठी शेतकऱ्यांना साडेतीन ते चार हजार रुपये मोजावे लागले. मात्र, बाजारात सोयाबीनचा दर सुमारे चार हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास होता. बियाणे आणि शेतमालाच्या दरातील ही तफावत शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचे गांभीर्य अधोरेखित करणारी ठरत आहे.

रेणापूर तालुक्यात दरवर्षी सुमारे ३५ ते ३६ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज भासते. त्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल १७ ते १८ कोटी रुपये खर्च करावे लागतात. तूर, मूग, उडीद आणि अन्य खरीप पिकांच्या बियाण्यांसाठी आणखी दीड ते दोन कोटी रुपये खर्च होतात. म्हणजे केवळ बियाण्यांसाठी दरवर्षी सुमारे २० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशातून जातात.

याशिवाय पेरणी, खते, कीटकनाशकांची फवारणी, अंतर्गत मशागत, मजुरी आणि सालगड्यांच्या वेतनावर वर्षाकाठी आणखी १० ते १२ कोटी रुपये खर्च होतात. मात्र, यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला. ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनच्या शेंगा करपून गेल्याने शेतकऱ्यांचा मोठा खर्च अक्षरशः मातीमोल झाला आहे.

यंदा पेरण्या वेळेवर झाल्याने सुरुवातीला पिकांची स्थिती समाधानकारक होती. मात्र, त्यानंतर तब्बल दोन महिने पावसाने उघडीप दिली. परिणामी सोयाबीनसह अन्य खरीप पिके सुकू लागली. पोळ्याच्या सुमारास पाऊस झाला असता तर उत्पादनाची काही आशा होती; परंतु पावसाने पाठ फिरवल्याने उभ्या सोयाबीनच्या शेंगा करपल्या.

आता हे करपलेले पीक काढायचे कसे आणि रब्बीची पेरणी करायची कशी, या प्रश्नांनी शेतकऱ्यांना घेरले आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्र सुमारे ४८ हजार ७०० हेक्टर असून त्यापैकी सरासरी ४६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होते. मागील वर्षी सुमारे ४७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. उडीद आणि मूग या नगदी पिकांचे क्षेत्र कमी होत गेले आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढत गेले.

त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका आता सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. राज्य सरकारने पावसाची तूट आणि खरीप पिकांचे नुकसान लक्षात घेऊन राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयानंतर दुष्काळग्रस्तांसाठी विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, या सवलतींचा प्रत्यक्ष लाभ कधी आणि कितपत मिळणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.

गतवर्षी रेणा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसून माती खरडून गेल्याने नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याची तक्रारही आहे. यंदाच्या खरीप नुकसानीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बीची पेरणी, कर्जाची परतफेड आणि पुढील हंगामाचा खर्च उभा ठाकला आहे-

बियाण्यावर १७ ते १८ कोटींचा खर्च

यंदा प्रति हेक्टरी सुमारे ७५ किलो या प्रमाणात ४६ हजार हेक्टरसाठी जवळपास ३४ लाख ५० हजार किलो म्हणजेच सुमारे ३५ हजार क्चेिंटल सोयाबीन बियाणे लागले. या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अंदाजे १७ ते १८ कोटी रुपये खर्च करावे लागले. एवढा मोठा खर्च करूनही पावसाअभावी उत्पादन हातातून गेले आहे. त्यामुळे बियाणे महाग आणि सोयाबीन स्वस्त, अशी विसंगत परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT