घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी File Photo
लातूर

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकारी

गॅस वितरकांना सूचना; जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Ensure Smooth Supply of Domestic Gas Cylinders: District Collector

लातूर, पुढारी वृत्तसेवा आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. गॅस वितरणाबाबत पारदर्शकता राखावी आणि कोणत्याही परिस्थितीत अवैध विक्री होणार नाही यावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी येथे दिल्या.

लातूर जिल्ह्यातील गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारक आणि सेल्स ऑफिसर्सची बैठक झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गरजू आणि पत्र ग्राहकांनाच गॅसचा पुरवठा व्हावा, यासाठी एका गॅस कनेक्शनधारकाला २५ दिवसांच्या आत दुसरे सिलिंडर देण्यात येऊ नये. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना १०० टक्के घरपोच डिलिव्हरी देण्यात यावी. वितरकांनी फिफो आणि ओटीपी प्रणालीचा वापर करून घरपोच सेवा देणे अनिवार्य आहे.

ग्राहकांना एजन्सी किंवा गोदामावर बोलावू नये. तेल कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडून आकारू नये. गॅस एजन्सी ठरलेल्या वेळेतच सुरू व बंद ठेवाव्यात, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. गॅस सिलिंडरचे चुकीच्या पद्धतीने वितरण किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास, संबंधित वितरकावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

गॅस सिलिंडरची दैनंदिन मागणी आणि पुरवठा यांची माहिती जिल्हा प्रशासनास दररोज कळवणे बंधनकारक राहील. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना पूर्ण सहकार्य करून रेकॉर्ड अद्ययावत ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. नागरिकांनी गॅस टंचाईबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घाबरून जाऊन सिलिंडरची अनावश्यक साठवणूक करू नका. प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT