Latur News : लातूर जिल्ह्यात बहरल्या आमराई file photo
लातूर

Latur News : लातूर जिल्ह्यात बहरल्या आमराई

पोषक हवामानामुळे आंबा झाडे मोहोराने लगडली; उत्पादन वाढणार

पुढारी वृत्तसेवा

Due to favorable weather conditions, mango trees are laden with blossoms; production is expected to increase

लातूर, पुढारी वृत्तसेवा : यंदाचा पावसाळा आणि त्यानंतर कडाक्याची थंडी अशा निसर्गाच्या दुहेरी वरदानामुळे लातूर जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भागांत आंब्याची झाडे मोहोराने पूर्णपणे बहरली असून, पोषक वातावरणामुळे यंदा आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत झाली. त्यातच, यंदा पडलेल्या कडाक्याच्या थंडीने आंबा पिकासाठी टॉनिकचे काम केले आहे.

आंब्याला मोहर येण्यासाठी आणि तो टिकण्यासाठी विशिष्ट थंडीची आवश्यकता असते, जी यंदा पुरेपूर मिळाली आहे. सध्या जिल्ह्यातील रेणापूर, औसा, अहमदपूर आणि लातूर ग्रामीण भागातील आंबा बागांकडे नजर टाकल्यास झाडे पांढऱ्या-पिवळसर मोहोराने डवरून गेल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः गावरान, केसर या जातींच्या झाडांना यंदा मोठा बहर आला आहे.

मोहर चांगला आला असला तरी, आता या मोहोराचे फळात रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या वातावरणात मोहोरावर तुडतुडे किंवा बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. फळधारणा होताना पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार योग्य कीटकनाशकांची फवारणी केल्यास मोहर गळती थांबवता येईल. यंदाचा हा आम्रबहार जर टिकून राहिला, तर लातूरच्या बाजारपेठेत एप्रिल-मे महिन्यात रसाळ आंब्यांची मोठी आवक पाहायला मिळेल, यात शंका नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोहर खूप चांगला आहे. हवामान असेच स्थिर राहिले आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले नाही, तर यंदा आंब्याचे उत्पादन गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठू शकते, असा विश्वास स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
- हणमंतराव जाधव, पळशी, ता. रेणापूर (शेतकरी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT