Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणार file photo
लातूर

Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणार

मुख्यमंत्री : लातूर, धाराशिवची पाहणी, दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर काढणार

पुढारी वृत्तसेवा

Drought-affected farmers will be provided direct financial assistance Chief Minister Devendra Fadnavis

लातूर/धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढला जाईल आणि शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच थेट आर्थिक मदत दिली जाईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांना मदत देताना केवळ खरीप पिकांचा नव्हे तर रब्बी हंगामातील नुकसानीचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (दि.२३) लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. लातूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच खरोसा आणि जाऊ येथे शेतकऱ्यांशी चर्चा करताना दुष्काळाबाबत शासन संवेदनशील असल्याचे नमूद केले. यावर्षी सर्वात कमी म्हणजे लातूर जिल्ह्यात यंदा सुमारे ५० टक्के पाऊस झाला असून परिस्थिती गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नदी, नाले, विहिरी कोरड्या आहेत. सोयाबीनही नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत, असे ते म्हणाले. रब्बी पिकांसाठीही मदत केली जाईल आणि दुष्काळाची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पावसाअभावी सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि अन्नधान्याचा पुरवठा यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी कर्जमुक्त योजना ही सर्व शेतकऱ्यांना लाभहोईपर्यंत चालूच राहील, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली जातील. रोजगाराची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले जातील, यंदा असणारे संकट हे १९७२ पेक्षाही मोठे आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी धीर ठेवावा.

लातूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले. दोन दिवसांत शासन निर्णय काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय बनसोडे, आ. बसवराज पाटील, माजी आमदार धीरज देशमुख, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना पाहताच शेतकरी ढसाढसा रडला..

'आभाळ फाटलंय साहेब... साल कसे काढायचं, गुरे-ढोरं कशी जगवायची? तुम्हीच आमचा आधार आहात... अशी आर्त हाक देत निलंगा तालुक्यातील जावू आणि औसा तालुक्यातील खरोसा येथील शेतकऱ्यांनी वाळलेल्या सोयाबीनच्या धाटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिल्या. डोळ्यांत साचलेले अश्रू आणि हातात करपलेल्या पिकांच्या धाटी देतांना शेतकऱ्यांचा आक्रोश बांध फुटल्यागत बाहेर पडला.

शेतकऱ्यांची ही व्यथा ऐकताना मुख्यमंत्रीही गहिवरले. "पावसाअभावी उभे सोयाबीन वाळून गेले, विहिरीत थेंबभर पाणी नाही, जनावरांना काय खाऊ घालावे? त्यात बँकेचे कर्ज डोक्यावर आहे....." हे सांगताना 'जाऊ येथील शेतकरी नूरर पटेल यांना अश्रू अनावर झाले. करपलेल्या पिकाची माहिती देताना ढसाढसा रडले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना हात जोडले, पाया पडल्या व आपल्या व्यथा व्यक्त केल्या. या भावुकप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नुर पटेल यांचा हात हातात धरून त्यांचे सांत्वन केले आणि "घाबरू नका, सरकार तुमच्यासोबत आहे," असा भक्कम आधार दिला त्याच्यासोबत शेतीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांसमोर काही महिलांनाही भावना अनावर झाल्या. गेल्या वर्षी अतिवृष्टीने मारले, यंदा दुष्काळाने अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. करजखेडा (ता. धाराशवि) येथे बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी कळंब तालुक्यातील मलकापूर आणि येरमाळा परिसरातील पिकांची पाहणी केली. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेले पाणी आता केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT