Dogs attack a trader in Udgir
उदगीर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मोकाट श्वानांने उच्छाद झाला असून शहरातील चोबारा परिसरातील चौदापुडी व्यापारी चंद्रकांत विजय वडजे हे आपले दुकान बंद करून शट्टरला लॉक लावत असताना पाठीमागून येऊन श्वनाने अचानकपणे ओठाचे लचके तोडून व्यापाऱ्याला गंभीर जखमी केले, या घटनेने शहरावासीयांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
उदगीर शहरातील प्रत्येक भागात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून दररोज नागरिकांना चावा घेत असल्याच्या घटना घडत आहेत. याला नगरपालिका प्रशासनाने आळा घालावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. प्रत्येक गल्लीत श्वनांची टोळीच सक्रिय झाली असून सर्व श्वान एकत्र जमून आपल्या शिकारीच्या शोधत असतात. येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
उदगीर शहरासह तालुक्यात दररोज १५ ते २० नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेऊन नागरिकांना जखमी करीत आहेत. परिणामी जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत मागील ८ महिन्यात उदगीर सामान्य रुग्णालयात ५ हजार ३२१ रुग्णांनी इंजेक्शन घेतले आहेत. सरासरी महिना ६६५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. २०२५ मध्ये ५३२१ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. मात्र या कालावधीत नगरपालिका प्रशासनाच्या विशेष पथकाने शहरातील श्वनांना पकडून पैशु वैद्यकीय महाविद्यालयात ५२० श्वनांना निर्बीजीकरण करण्यात आले.
भर रस्त्यावर घराच्या बाजूला सतरा ते अठरा कुत्रे दररोज फिरत आहेत मागे काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीवर हल्ला केला व त्याच दिवशी सकाळी सहा वाजता कॉलनीतील एक प्रौढ व्यक्ती फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा या पाच सहा कुत्र्याने हल्ला केला अशा अनेक घटना दर चार दिवसांनी घडत आहेत. पण याचे प्रशासन कुठलीच दखल घेत नाही मुले घराच्या बाहेर खेळायला ही जाऊ शकत नाहीत. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही याचा बंदोवस्त होऊ शकत नाही.- अनिता येलमटे, शिक्षिका, उदगीर
उदगीर शहरात खूप मोठ्या प्रमाणात श्वनाच्या संख्येत वाढ झाली असून परिणामी नागरिकांना चावा घेण्याचे घटना नेहमी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मागील काळात भटक्या श्वनांना पकडून निर्बीजीकरण करण्यात आले होते. मंगळवारी रात्री चौबारा परिसरात एका व्यापाऱ्यावर श्वनांनी केलेला हल्ला खूप गंभीर बाब असून या प्रकरणी नगरपालिका प्रशासनाकडे नागरिकांची निवेदने पण प्राप्त झाली आहे. श्वनांना आळा कसा बसवता येईल या विषयी वरिष्ठांशी चर्चा करून तत्काळ अंमलबजावणी करीत आहोत व उद्यापासून नगरपालिकेच्या विशेष पथकामार्फत श्वनांची निर्बीजीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.- महेश शिंदे, उपमुख्याधिकारी, न.प. उदगीर