

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या निलंबन आदेशाला शासनाने रद्द केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, यासोबतच विभागीय चौकशीही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी निरोप समारंभात तहसीलदारांच्या खुर्चीत बसून गाणे गायल्यानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करुन निलंबन केले होते. l
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. आता त्यांचे निलंबन आदेश रद्द करत त्यांना पुन्हा पूर्ववत रेणापूर तहसीलदारपदावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. महसूल विभागाने याबाबत औपचारिक आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे प्रशांत थोरात यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी एका निरोप समारंभात गाणे गात असतानाच्या व्हायरल व्हिडीओमुळे थोरात हे प्रकाश झोतात आले होते.
गेल्या महिन्यात घडली होती घटना
तेरे जैसा यार कहा हे गाणे थोरात यांनी गायले होते. नांदेड उमरी येथील निरोप संमारंभात ८ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी थोरात यांचे निलंबन केले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या व्हायरल व्हिडीओरची दखल घेतली होती. या प्रकरणात शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे असा ठपका ठेवत थोरात यांचे निंलबन झाले होते. विशेष म्हणजे केवळ १२ दिवसांपूर्वीच त्यांची रेणापूर येथे बदली झाली होती.