भूकंपाची ३१ वर्षे : भूकंपग्रस्त गावात होता धीरुभाईंचा मुक्काम; सतरंजीवर झोपले... Dhirubhai Ambani
लातूर

भूकंपाची ३१ वर्षे : भूकंपग्रस्त गावात होता धीरुभाईंचा मुक्काम; सतरंजीवर झोपले...

पुढारी वृत्तसेवा
शहाजी पवार

लातूर, १६ व्या वर्षी अवघ्या ३०० रुपयांच्या पगारावर नोकरी करीत पुढे ५०० रुपयांवर व्यवसायाचा पाया घालत अंचबा बाटावा अशी रिलायन्स इंडस्ट्री साकारणारे उद्योगपती धीरजलाल हिराचंद अंबानी ऊर्फ धीरूभाई अंबानी हे लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त बाणेगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅम्पमध्ये मुक्कामी होते.

दिवसभर त्यांनी भूकंपग्रस्त गावात पायपीट करून तीन संस्थांना घरे बांधण्यासाठी भरीव मदत केली होती. कसलाही लवाजमा न घेता व बडेजाव न करता आलेल्या अंबानींची ही आठवण तब्बल एकतीस वर्षांनंतर त्यावेळी त्यांच्यासमवेत असलेले संघ कार्यकर्ते प्रा. उमाकांत होनराव यांनी खास दै. पुढारीशी शेअर केली अन् अंबानी परिवाराच्या सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा पैलू उजळून निघाला.

३० सप्टेंबर १९९३ च्या प्रलंयकारी भूकंपाने काही सेकंदांत लातूर व धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना जमीनदोस्त केले होते. या संकटसमयी जगभरातून दशदिशांनी मदतीचे हात पुढे येत होते. या आपत्तीने उघड्यावर पडलेल्या माणसांना निवारा देणे हे त्यावेळी अत्यंत गरजेचे होते. संकटसमयी सेवाधर्माला जागणाऱ्या रा.स्व. संघाचे अनेक कार्यकर्ते भूकंपग्रस्त भागात त्यावेळी सेवा देत होते.

गोवा येथील संघ कार्यकर्ते, शिपिंग कॉर्पोरशन उद्योजक तथा धीरुभाई अंबानी यांचे जावई राज साळगावकर व स्वतः धीरूभाईंना भूकंपग्रस्त गावांतील घरांच्या बांधकामासाठी जनकल्याण, रामकृष्ण मिशन व द हिंदू या संस्थांना मदत करावयाची होती. त्यासाठी ते सुभाष वेलणकरांना घेऊन गोव्याहून हैदराबादला व तेथून थेट बाणेगाव येथे आले होते. तिथे दिवसभरात त्यांनी किल्लारी, एकोडी, रेबेचिंचोली, सास्तूर, किल्लारीवाडी, हरेगाव, बाणेगाव या गावांत पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी आपली ओळख कुणाला सांगितली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनाही एवढा मोठा माणूस आपल्याशी बोलतोय चवाळ्यावर बसतोय हे समजले नाही.

धीरूभाई व त्यांच्यासमवेत आलेल्या मान्यवरांचा मुक्काम बाणेगावच्या तंबूतच होता. रात्री सर्वांबरोबर त्यांनी बेसन-भाकरी खाल्ली. संतरंजीवरच त्यांनी अंग टाकले. विशेष म्हणजे जमिनीतून येणारे भूकंपाचे आवाज नेमके कसे असतात? हे ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत धीरूभाई जागी होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ही मंडळी सर्वांना नमस्कार करून हैदराबादकडे मार्गस्थ झाली. या गाठीभेटीला आज ३१ वर्षे झाली तरी त्यांचा सेवाभाव आमच्या हृद्यात घर करून राहिल्याचे प्रा. होनराव यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT