गोरख भुसाळे
किनगाव : विवाह म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक क्षणः पण अनेक कुटुंबांसाठी तो आर्थिक चिंतेचे ओझे घेऊन येतो. ती काळजी काही अंशी तरी दूर व्हावी हीच जाणीव मनाशी बाळगून अहमदपूर तालुक्यातील देवकरा ग्रामपंचायतीने एक हृदयस्पर्शी निर्णय घेतला आहे. आता गावातील प्रत्येक लेकीच्या विवाहासाठी 11 हजार रुपयांची मदत देत, तिच्या नव्या आयुष्याच्या प्रवासात गाव तिच्या पाठीशी मोठ्या ममतेने उभे राहणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
या उपक्रमाला करुणेची किनार आणि बांधिलकीचा पदर आहे. गावच्या सरंपच वंदना बदने आणि त्यांचे पती तथा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याण बदने यांनी लग्नामुळे अनेक आई-वडिलांची होणारी आर्थिक घालमेल पाहिली होती. आपण थोडाफार आर्थिक हातभार लावून काहीअंशी तरी दूर करावी अशी या दोघांचीही प्रांजळ भावना होती ग््राामसभेत त्यांनी आपला हा मनोदय मांडला आणि तो ठराव एकमताने मंजूर झाला. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, आणि गोरगरीब कुटुंबांना थोडासा हातभार लागावा, या भावनेतून ही योजना साकार झाली आहे. आई प्रतिष्ठानही या मानवसेवेत आपला सहभाग देणार आहे.
देवकरा गावात याआधीही आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण, पाण्याच्या जारचे वाटप असे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. मात्र, मुलीच्या विवाहासाठी थेट आर्थिक मदत देण्याचा हा निर्णय गावाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव उजळ करणारा ठरणार आहे. या योजनेची सुरुवात 7 मे रोजी अंबाजोगाई येथे होणाऱ्या एका लेकीच्या विवाहापासून होत आहे. तिच्या आनंदात आता संपूर्ण गाव सहभागी होणार आहे. सुमारे 2700 लोकसंख्या असलेल्या देवकरा गावात या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळणार असून, लेकीच्या लग्नात गावचं कुटुंब बनून उभं राहणं ही भावना प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विवाह सोहळा म्हटले अनेक मुलींच्या वडिलांची आर्थिक अडचणीमुळे मोठी ओढाताण होते. ती काहीअंशी तरी दूर व्हावी या प्राजंळ भावनेने आम्ही ही मदत देणार आहोत व याच भावनेतून ही संकल्पनाही सुचलेली आहे. शुक्रवार 7 मे रोजी अंबाजोगाई येथे होणार्या आमच्या गावातील एका लेकीच्या लग्नापासून या विधायक उपक्रमाला सुरुवात करीत आहोत.वंदना कल्याण बदने, सरपंच